06 March 2021

News Flash

८ आणि ९ सप्टेंबरला डॉ. जब्बार पटेल चित्रपट महोत्सव

गेल्या दोन वर्षांपासून नागपुरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केले जातात.

(संग्रहित छायाचित्र)

ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन, नागपूर महापालिका, सप्तक  आणि विदर्भ साहित्य संघ यांच्यातर्फे आयोजन

ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन, नागपूर महापालिका, सप्तक  आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ सप्टेंबरला ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या दर्जेदार अशा मराठी चित्रपटाचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जब्बार पटेल यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून नागपुरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केले जातात. यात देश-विदेशातील पुरस्कारप्राप्त चित्रपट दाखवले जातात. त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. जब्बार पटेल यांनी एकापेक्षा एक सरस मराठी चित्रपटांची निर्मिती केली असून रसिकांना या चित्रपटाचा आस्वाद घेता यावा आणि सोबतच त्यांच्या चित्रपटावर चर्चा व्हावी, या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

दुसऱ्या दिवशी तीन चित्रपट दाखवले जाणार आहेत. सकाळी ९ वाजता ‘जैत रे जैत’ हा चित्रपट दाखवला जाईल. त्यावर अजय गंपावार हे पटेल यांच्याशी संवाद साधतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर तयार करण्यात आलेला चित्रपट दाखवला जाणार असून त्यावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, इंडियन थिएटर या लघु चित्रटावर ज्येष्ठ चित्रपट समीक्षक समर नखाते आणि अभिनेते सतीश आळेकर आपले विचार मांडणार आहेत. दोन दिवस चालणारा हा चित्रपट पर्सिस्टंट सिस्टीम्सच्या कवी कुलगुरू कालिदास ऑडिटोरियममध्ये होणार आहे. रसिकांसाठी हा महोत्सव नि:शुल्क आहे.

नितीन गडकरी चित्रपटावर भाष्य करणार

८ सप्टेंबरला दुपारी १ वाजता महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर पटेल यांचा राजकारणावर आधारित ‘सिंहासन’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे. या चित्रपटानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चित्रपटाबाबत मत व्यक्त करतील आणि त्यावर जब्बार पटेल भाष्य करतील. त्यानंतर ‘मुक्ता’ हा चित्रपट दाखवला जाणार असून त्यावर सामाजिक कार्यकर्त्यां अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी बोलणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 2:08 am

Web Title: on september 8 and 9 jabbar patel film festival
Next Stories
1 ‘वैद्यकीय’ची गुणवंत शिक्षक यादी वादात!
2 तक्रार असेल तोच खड्डा बुजवणार!
3 अंधश्रद्धेमुळे सॅनिटरी नॅपकिन उद्योगांची संख्या कमी
Just Now!
X