17 November 2019

News Flash

रुग्णाच्या आहारातून पोळीला कात्री!

सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील रुग्णांचे जेवण मेडिकलच्या स्वयंपाकगृहातच तयार होते.

सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील प्रकार

नागपूर : सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील आहारातून दोनपैकी एका पोळीला कात्री लागल्याचा प्रकार बुधवारी पुढे आला. अन्न तयार होणाऱ्या मेडिकलच्या स्वयंपाकगृहात सुपरच्या प्रत्येक रुग्णांसाठी दोन पोळ्या पाठवल्याची नोंद असताना येथील रुग्णाला एकच पोळी मिळाल्याने येथे खोटय़ा नोंदीचा खेळ सुरू आहे काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील रुग्णांचे जेवण मेडिकलच्या स्वयंपाकगृहातच तयार होते. सायंकाळचे जेवण साडेपाच ते सहाच्या दरम्यान सुपरला एका विशेष वाहनाने पोहचवले जाते. स्वयंपाकगृहातील कर्मचारी सुपरमधील विविध वार्डात जाऊन जेवण वितरित करतात. बुधवारी रुग्णांना एकच पोळी वाढण्यात आली. येथील काही रुग्णांना मेडिकलच्या स्वयंपाकगृहात मात्र प्रत्येकी दोन पोळ्या नोंदवल्याचे कळले. येथील रुग्णांच्या आहारातून बऱ्याच वर्षांपूर्वी मांसाहारासह अंडी बाद करण्यात आली. आता पोळीलाही कात्री लागल्याने रुग्णाला आहारातून आवश्यक घटक मिळणार कसे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यातच मेडिकलच्या स्वयंपाकगृहाची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाकडे आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या कामावरच गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, बुधवारी सुपरस्पेशालिटी रुग्णालयांतील केवळ २०१ रुग्णांसाठी जेवण पाठवण्यात आले होते, परंतु येथे २५० ते ३०० च्या जवळपास रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे या आहारातच सगळ्यांचे समाधान करण्याच्या सूचना संबंधितांना असल्याचेही नातेवाईकांच्या प्राथमिक तपासणीत पुढे आले.

‘‘मेडिकलच्या स्वयंपाकगृहात काही समस्या उद्भवल्यास असा प्रकार घडू शकतो. तरीही पोळीएवजी पाव दिले जातात. बुधवारी पोळ्या कमी गेल्या का, हे चौकशी करून तपासले जाईल. सोबतच मेडिकलच्या स्वयंपाकगृहातील नोंदीही तपासण्याचा प्रयत्न करू.’’

– डॉ. मिलिंद फुलपाटील, विशेष कार्य अधिकारी, सुपरस्पेशालिटी रुग्णालय.

First Published on July 11, 2019 3:41 am

Web Title: one chapati cut from diet in super speciality hospital zws 70