चंद्रपूरचा एक जण करोनाग्रस्त आढळला; दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी

नागपूर : नागपूरच्या मेयो रुग्णालयानंतर एम्स रुग्णालयात करोनाची तपासणी सुरू झाल्यावर वैद्यकीय शिक्षण खात्याने करोना तपासणीबाबतची विभागणी करून दिली आहे. त्यानुसार मेयोवर ६ तर एम्सवर ५ जिल्ह्य़ांचा भार टाकण्यात आला आहे.

मेयोकडे जबाबदारी दिलेल्या जिल्ह्य़ांमध्ये नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा या जिल्ह्य़ातील रुग्णांच्या नमुने तपासणीची तर एम्सकडे अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्य़ातील रुग्णांच्या नमुन्यांची तपासणीचा भार दिला  आहे. दुसरीकडे मेयोतील सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रवींद्र खडसे आणि उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी सोमवारी एम्समधील तज्ज्ञांना एका प्रक्रियेत सुमारे ३० ते ३३ नमुने तपासण्याबाबतचे तंत्र सांगितले. सध्या एम्समध्ये एका प्रक्रियेत २० ते २५ नमुन्यांचीच तपासणी होत आहे. या तंत्रामुळे आता तेथेही एकाच वेळी ३० ते ३३ नमुने तपासता येईल.

दरम्यान, दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या व सध्या आमदार निवासात सक्तीच्या विलगीकरणात असलेल्या च्रदपूरच्या एकाला करोनाची बाधा झाल्याचे सोमवारी एम्सच्या प्रयोगशाळेतील अहवालातून पुढे आले. या रुग्णाला प्रशासनाने तातडीने  शासकीय रुग्णालयात हलवले.

हा रुग्ण हा इंडोनेशियातून दिल्ली मार्गे नागपूरला परतल्याची नोंद आहे. मेडिकल  येथे  नमुने घेतल्यावर त्याला आमदार निवासातील विलगीकरणात ठेवण्यात आले. त्याचे नमुने आज तपासले असता त्याला करोनाची बाधा असल्याचे पुढे आले. ही माहिती प्रशासनाला कळताच त्याच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. या सगळ्यांना तातडीने मेडिकल, मेयोत हलवून त्यांचीही तपासणी केली जाणार आहे. दुसरीकडे रविवारी रात्री उशिरा मध्य नागपुरातील एका करोनाग्रस्ताच्या पत्नी, पाच मुले, दोन भाचे अशा जवळच्या आठ जणांचे अहवाल नकारात्मक आल्याने प्रशासनाला आंशिक दिलासा मिळाला. या रुग्णात करोनाची  लक्षणे नव्हती. शिवाय प्रतिकार शक्ती चांगली असल्याने ते आजारापासून बचावल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला. परंतु या सगळ्यांना खबरदारी म्हणून १४ दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे.

डॉ. वानखेडेच्या संशोधनातील संच मेयोत

नागपूरच्या डॉ. गौतम वानखेडे यांच्या संशोधनातून माय लॅबने विकसित केलेले पॅथो डिटेक्ट कोव्हिड- १९ संच अखेर मेयोत पोहोचले आहे. या संचात  सहा ते सात तासांच्या ऐवजी चार ते पाच तासांत नमुन्यांची तपासणी होण्यासह त्याचा खर्चही मोठय़ा प्रमाणात कमी होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. प्राथमिक स्तरावर दोन संच असले तरी मंगळवारी आणखी पुरवठा होणार आहे. या एका संचात सुमारे १०० नमुने तपासले जातात. सध्या भारतात जर्मनीहून करोना तपासणीसाठी संच आयात केले जात आहेत.

मेयोच्या ‘त्या’ यंत्रावर ३० नमुने तपासले

मेयोच्या दुरुस्त झालेल्या यंत्राची सोमवारी सकाळी प्रायोगिकचाचणी झाल्यावर दुपारी प्रथम ३० नमुने तपासण्यात आले. त्यांचा अहवाल रात्री उशिरा मिळणार आहे. दुसरीकडे मेडिकलमध्ये करोना तपासणी सुरू होत नसल्याने हे काम टाळण्यासाठी काही अधिकारी प्रयत्न करत आहेत काय,  हा प्रश्न वैद्यकीय क्षेत्रात विचारला जात आहे. या  प्रयोगशाळेला सध्या राज्याच्या व्हीआरडीएल या संस्थेची परवानगी असून आपत्कालीन स्थितीत संच खरेदी करून तातडीने ही तपासणी करता येते. परंतु ‘आयसीएमआर’ या संस्थेकडून परवानगीच्या नावाखाली पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतून संच येण्याकडे बोट दाखवत ही तपासणी खोळंबली आहे.