विजेची मागणी १,४३५ मेगावॅटने कमी झाली

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी रात्री नऊ मिनिटे राज्यातील लक्षावधी घरातील विजेचे दिवे बंद झाल्याने अचानक विजेची मागणी १,४३५ मेगावॅटने कमी झाली. परिणामी वीज कंपन्यांना देयकातून सुमारे ८० लाखांचा महसूल कमी मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुसरीकडे वीज निर्मिती कंपन्यांना या काळात वीज निर्मिती संच स्थिर ठेवण्यासाठी सुमारे २० लाखांचे हेवी फ्युअल ऑईल लागल्याने सुमारे १ कोटीचा फटका बसला.

राज्य भार प्रेशन केंद्राच्या निरीक्षणानुसार, रविवारी रात्री ८.५९ च्या सुमारास राज्यातील विजेची मागणी ११,३१५ मेगाव्ॉट होती. नागरिकांनी दिवे बंद केल्यावर ती हळूहळू कमी होत ९.९ मिनिटांनी ८,८८० मेगाव्ॉटवर आली. वीज क्षेत्राच्या निकषानुसार पॉवर ग्रिडची वारंवारिता (फ्रेक्वेन्सी) ४९.९ ते ५०.२ हट्स ही सामान्य आहे. परंतु या नऊ मिनिटांत ती ५०.२३ हट्सपर्यंत ती वर गेल्याने अधिकाऱ्यांची चिंता वाढली होती. परंतु तातडीने उपाय केल्यावर ती ५०.९ पर्यंत आली. या काळात १,४३५ मेगावॅटने विजेची मागणी कमी झाल्याने राज्यात दीड ते पावणे दोन लाख युनिट वीज कमी वापरली गेली.

या प्रकाराने वीज निर्मिती आणि वीज वितरण कंपनीला सुमारे ८० लाखांचा महसूल कमी मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीज कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसह इतर गोष्टींवर नित्याने निश्चित खर्च येतो. दरम्यान, वीज देयकापोटी ग्राहकांकडून महसूल कमी होऊन वीज निर्मिती खर्च किंचित वाढून त्याचा भार अप्रत्यक्ष ग्राहकांवरच पडणार आहे. दुसरीकडे अचानक विजेची मागणी कमी-अधिक होऊन वीज निर्मिती संचात बिघाड होऊ नये म्हणून महानिर्मितीने कोराडी, चंद्रपूर, पारससह इतर वीज निर्मिती संचासाठी सुमारे ४० हजार लिटर हेवी फ्युअर ऑईल वापरले. त्यामुळे कोराडीतील ६६० मेगावॅटच्या ३, चंद्रपूरच्या ५०० मेगावॅटच्या १, पारसच्या २५० मेगाव्ॉटच्या १ निर्मिती संचातून वीज निर्मिती वाढवताना संच स्थिर राहिले. दुसरीकडे आपत्कालीन स्थितीत कोयनाच्या जलविद्युत प्रकल्पातून महानिर्मितीने १,८०० मेगावॉटपर्यंत वीज निर्मिती वाढवताना मोठय़ा प्रमाणावर पाणी सोडावे लागल्याने हा खर्च मोजणे शक्य नसल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले. नागपूरच्या अंबाझरी भार प्रेशन केंद्रात बसून या सर्व स्थितीवर ऊर्जामंत्री स्वत: आढावा घेत होते. शेवटी कोणतीही अनुचित घटना न घडल्याने त्यांनी सलग २४ तास काम करणाऱ्या ४९,०००  कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

‘‘नऊ मिनिटे विजेची मागणी अचानक १,४३५ मेगावॅटने कमी झाल्याने महावितरणचा महसूल ७० ते ८० लाखांनी कमी होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.  ग्रिड  सुरक्षित ठेवण्यासाठी तिन्ही वीज कंपन्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत स्वत: या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवत नागपूरच्या अंबाझरीतील भार प्रेशन केंद्रात बसले होते.’’

– अनिल कांबळे,  मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई.