एकाच वेळी शंभर किलो माती मळणे शक्य

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे संचालित महात्मा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल इंडस्ट्रिलायझेशनच्या (एमजीआयआरआय) शास्त्रज्ञांनी विकसित केलेले सौर चाक व माती मळणी यंत्रामुळे कुंभारांची मातीकला गतिमान होणार आहे.

माती मळणी यंत्राद्वारे काही तासांत तीन आठवडे पुरेल एवढी माती तयार करता येते. या यंत्राचे संशोधन ‘एमगिरी’चे वैज्ञानिक एस. पी. मिश्रा यांनी केले असून त्याला नुकतेच ‘पेटेन्ट’ प्राप्त झाले आहे. मातीला फिरत्या चाकावर हवा तो आकार देण्यासाठी ‘पॉटरव्हील’ तंत्रज्ञान विकसित केले. पॉटरव्हील सौरऊर्जेवर चालते. हे तंत्रज्ञान प्रायोगिक तत्त्वावर नागपूर जिल्ह्य़ात पेठचे कुंभार मोतीराम खंदारे यांना दिले आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील वर्धा, चंद्रपूर, अकोला येथे प्रत्येकी एक कुंभार आणि मध्यप्रदेशात दोन ठिकाणी ते मोफत पुरविले आहे. पॉटरव्हील चालविण्यासाठी दोनशे पॅनेलचे व्ॉट वीजनिर्मिती क्षमतेचे दोन सोलर पॅनल दिले. या दोन पॅनलमुळे अधिकची ऊर्जा बॅटरीमध्ये साठवून दिवस-रात्र काम करणे शक्य होते.

माती मळणी यंत्र हे विजेवर चालते. आजही देशातील कुंभार पारंपरिक पद्धतीने खड्ड्यात उतरून माती मळतात.  मातीतील दगड, काच आदींमुळे खड्ड्यात उतरून काम करणाऱ्यांच्या पायांना अनेक प्रकारच्या इजा होतात.

या सर्व बाबींवर मात करून ‘एमगिरी’च्या वैज्ञानिकांनी यंत्र विकसित केले.  या यंत्रात माती आणि पाणी टाकल्यानंतर ती आपोआप मळली जाईल आणि मातीमधील दगड व इतर टाकाऊ पदार्थ बाहेर फेकले जातील. पायाने मळण्यात येणाऱ्या  मातीपेक्षा दहापट चिकन माती मशीनमधून निघते. त्यामुळे अशा मातीपासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तू अधिक सुबक आणि सुंदर होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

उत्पादनात मोठी वाढ

या यंत्रामुळे कुंभारांचा वेळ वाचेल. शिवाय त्यांच्या कामात अतिक गती येईल आणि इजा होणार नाही. मातीपासून तयार करण्यात येणार्या वस्तूू अधिक सुंदर बनतील आणि त्यांच्या बाजारभावात वाढ होईल.आतापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर यंत्रांचा वापर सुरू असून त्या कुंभारांचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. ही मशीन चालविण्यासंदर्भात कुंभारांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी एमगिरी तयार आहे.

डॉ. एस. पी. मिश्रा, वैज्ञानिक.

पेटेन्ट’नंतर यंत्र बाजारात उपलब्ध होईल

पेटन्ट मिळाल्याने माती मळणी यंत्र निर्मितीसंदर्भात ‘एमगिरी’ निर्णय घेईल. सरकारने या यंत्रांची निर्मिती केल्यास ते माफक दरात कुंभारांना उपलब्ध होईल, यात शंका नाही. परंतु खासगी कंपनीसोबत करार करताना माती मळणी यंत्राची किंमत अल्प ठेवण्याची अट टाकण्यात येईल.

डॉ. प्रफुल्ल काळे, संचालक, एमगिरी.