नागपूर : जादूटोण्याच्या संशयावरून नागपूर जिल्ह्य़ातील कुही जवळच्या मुसळगाव येथे ५५ वर्षीय व्यक्तीची एकाच कुटुंबातील चार जणांनी काठीने मारहाण करून हत्या केली. पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत चौघांनाही अटक केली आहे.

विद्याधर भिमा रंगारी (५५) रा. मुसळगाव, ता. कुही असे मृताचे नाव आहे. तर पुरुषोत्तम भुजाडे (३२), देवेंद्र ऊर्फ डोमा भुजाडे (२९), धर्मेद्र भुजाडे (२५), श्रीधर भुजाडे (३४) सर्व रा. मुसळगाव, तह. कुही अशी चारही आरोपींची नावे आहेत.

भुजाडे कुटुंबातील एक सदस्य नेहमीच आजारी असतो. तसेच सुनेच्या अंगात देवी येत असल्याचा नातेवाईकांचा समज होता. विद्याधर जादूटोणा करत असल्याने हा सदस्य आजारी राहत असल्याचा भुजाडे कुटुंबाचा संशय होता. या अंधश्रद्धेवरून विद्याधरवर भुजाडे कुटुंबाचा राग आहे. ६ मार्चला भुजाडे कुटुंबातील चार सदस्य दुपारी पाचच्या सुमारास विद्याधरच्या पानटपरीवर जात चौघांनी त्याच्यावर लाठीने हल्ला चढवला. त्यात विद्याधर गंभीर जखमी झाला.

दुसऱ्या दिवशी ७ मार्चला विद्याधरची प्रकृती खालवल्याचे कळल्यावर भुजाडे कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात हलवले. परंतु उपचारादरम्यान विद्याधरचा मृत्यू झाला. प्रतिमा विद्याधर रंगारी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावरे आणि मदने करत आहेत.