नागपूर : मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्याच्या महसुली उत्पन्नातील तूट सध्या ७५ हजार कोटींपर्यंत गेली आहे. पुढच्या काळात केंद्र सरकारकडून येणे असलेले २५ हजार कोटी मिळाले नाहीत आणि बाजारात मंदीचे वातावरण कायम राहिले तर मार्चपर्यंत ही तूट एक लाख कोटीपर्यंत जाण्याची शक्यता उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी येथे वर्तवली.

राज्याचा अर्थसंकल्प पुढच्या महिन्यात सादर केला जाणार आहे. तो मांडताना अनेक निर्बंध येण्याचे संके त पवार यांनी दिले. करोनामुळे राज्याच्या विस्कटलेल्या घडीकडे लक्ष वेधताना पवार म्हणाले, करापासून मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे.

उद्योग आणि  व्यवसायही पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. बाजारात मागणीही वाढलेली नाही, त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसलेला आहे.  केंद्रीय अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्प सादर करताना तारेवरची कसरत करावी लागली होती.  राज्य सरकारलाही अडचणीतून मार्ग काढावा लागेल. केंद्राकडे नोटा छापण्याचा पर्याय आहे, पण राज्य सरकारकडे तोही नाही, त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प काटकसरीचा राहू शकते, असे संके त त्यांनी दिले.

घोषणा करण्यापूर्वी मंत्र्यांनी तिजोरीचा मागोवा घ्यावा!

करोना काळातील वीज बिल माफीच्या घोषणेवरून अजित पवार यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे नाव न घेता कान टोचले. मंत्र्यांनी घोषणा करण्यापूर्वी तिजोरीचा मागोवा घ्यावा, असे यापूर्वी ठरले आहे, त्याचे पालन मंत्र्यांनी करावे, अशी अपेक्षा आहे, असे पवार म्हणाले. अदानी-पवार भेटीचा वीज बिल माफी न देण्याच्या निर्णयाशी  काहीही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.