दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे पुराची कोणतीही शक्यता नसताना मध्य प्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्यामुळे पूर्व विदर्भात तिसऱ्या दिवशी पूरस्थिती गंभीर झाली आहे. भंडारा जिल्ह्य़ाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.

तीन दिवसांपासून मदतकार्य सुरू असले तरी आजही हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण १४६ गावांतील ९० हजारांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला. आतापर्यंत ५० हजारांहून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. दहा हजारांहून अधिक नागरिकांना १३८ निवारा शिबिरांमध्ये ठेवण्यात आले आहे.

‘एनडीआएफ’च्या चार, ‘एसडीआरएफ’च्या चार आणि लष्कराचा एक चमू मदतकार्य करत आहे. पूरग्रस्तांमध्ये  नागपूर जिल्ह्य़ाच्या ५७ गावांतील २७,९०१, भंडारा जिल्ह्य़ाच्या ५८ गावांतील ५५ हजार, चंद्रपूर जिल्ह्य़ाच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील २१ गावांतील ४,८५९ आणि गडचिरोली जिल्ह्य़ाच्या १० गावांतील ३,०९८ नागरिकांचा समावेश आहे. पूरग्रस्त भागांतील  शेकडो घरे कोसळली असून हजारो घरांत पाणी शिरले आहे. भंडारा जिल्ह्य़ांतील महापुराचा प्रकोप अधिक आहे. नदी काठाजवळील पिंडकेपर, कोरंभी ही गावे ४० तासांहून अधिक काळ पुराच्या वेढय़ात आहेत.

२३ जणांची सुटका

गडचिरोली जिल्ह्य़ातील गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक घरांत पुराचे पाणी शिरले आहे. गडचिरोली शहराजवळील कोटगल गावांमधील बॅरेजचे काम सुरू होते. त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात घरे बांधण्यात आली होती. त्या ठिकाणी २३ कामगार पुरात अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावांना पुराचा तडाखा बसला आहे.

समन्वयाचा अभाव-फडणवीस

पूर्व विदर्भातील पूरस्थिती गंभीर असून, पुराचे पाणी शिरल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ात मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या भागात तातडीने पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मध्य प्रदेश सरकारशी योग्य समन्वय न राखल्याने ही स्थिती उद्भवली आहे असा आरोप त्यांनी केला.

संजय सरोवरातून विसर्ग

मध्य प्रदेशातील संजय सरोवरातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे भंडारा जिल्हा प्रशासनाला कळताच सतर्कतेचा इशारा द्यायला हवा होता, परंतु तसे न झाल्याने नागरिक बेसावध राहिले आणि पाण्याचा प्रवाह वाढत गेला. या पुरात मातीची शेकडो घरे पडली, हजारो घरात पाणी शिरले आहे. चंद्रपूर आणि गोंदियातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे.