नकार दिल्याने शाळेच्या परिसरात मारहाण

एकतर्फी प्रेमातून तरुणाने काढलेली छेड व त्याच्या भावाच्या छळाला कंटाळून तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना हिंगणा पोलीस हद्दीत शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघा भावांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला.

आकाश जनार्दन राठोड (२२) आणि प्रकाश जनार्दर राठोड (१९) रा. मोहगाव झिल्पी अशी आरोपी भावंडांची तर प्रतीक्षा विष्णू कोल्हे (१७) रा. मोहगाव झिल्पी असे मृत तरुणीचे नाव आहे. प्रतीक्षा दहाव्या वर्गात शिकत होती. आरोपी आकाश हा तिच्याच गावातील रहिवासी असून तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. त्याने अनेकदा तिला प्रेमाची गळ घातली. तिने त्याला नकार दिला.

ही बाब त्याचा लहान भाऊ प्रकाश याला माहीत झाली. त्यामुळे तो प्रतीक्षाला आपल्या भावासोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. तिने त्यालाही नकार दिला. यानंतर रस्त्याने जाताना आरोपी तिच्यावर अश्लील टिप्पणी करायचे. या प्रकाराला ती कंटाळली होती.  २४ डिसेंबरला प्रतीक्षा शाळेत होती. त्यावेळी आरोपी प्रकाश हा तिच्या शाळेत पोहोचला व त्याने पुन्हा तिला आपल्या भावासोबत लग्न करण्याची गळ घातली.

तिने पुन्हा नकार दिला असता त्याने सर्व विद्यार्थ्यांसमोर गोंधळ घालून तिला मारहाण केली. यामुळे तिची शाळेत बदनामी झाली. शालेय परिसरात झालेला अपमान ती सहन करू शकली नाही व तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकाशला अटक केली.

प्रेम करणाऱ्याला मानसिक धक्का

प्रतीक्षावर एकतर्फी प्रेम करणारा आकाश याला तिच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यालाही मानसिक धक्का बसला होता, असे सांगण्यात येते. आकाश याचीही प्रकृती अचानक खालावल्याने त्याला लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आकाश याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या शेजारी बसलेला असताना प्रकाश याला पोलिसांनी अटक केली. आकाशला रुग्णालयातून सुटी मिळताच अटक करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

प्राचार्य, आईने घातली समजूत

पीडित मुलीची आई शाळेच्या परिसरात अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. शाळेत ही घटना घडल्यानंतर प्राचार्यानी तिच्या आईला बोलावून घेतले. घडलेला प्रसंग विसरून तिची समजूत काढली. त्यानंतर आई तिला घेऊन घरी पोहोचली. यावेळी तिने कपडे बदलण्याचे कारण सांगून घराच्या मागील दाराने बाहेर पडली व काही अंतरावर असलेल्या विहिरीत उडी घेतली.