सावरगावातील १६ पाणी नमुने दूषित; आरोग्य विभागाच्या बैठकीत धक्कादायक माहिती
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी आरोग्य विभागाच्या घेतलेल्या बैठकीत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ‘स्वाइन फ्लू’ने एकाचा मृत्यू झाल्याचे, तसेच गॅस्ट्रोचा उद्रेक झालेल्या सावरगावातील १६ जलस्त्रोतांमधील पाणी नमुने तपासणीत पिण्यायोग्य नसल्याचे आढळून आले.
सावरगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ८३८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक व खासगी विहिरींच्या ८१ जलस्त्रोतांचे क्लोरिनेशन करण्यात आले. ग्रामसफाई अभियान राबवून गावातील नाल्यांची साफसफाई करण्यात आली. सध्या चिखली येथील तीन विहिरीतून सावरगावला पाणीपुरवठा होत आहे. आतापावेतो येथील ६४ जलस्त्रोतांमधून पाणी नमुने घेण्यात आले. त्यातील १६ नमुने प्रदूषणयुक्त आढळले. स्वाइन फ्लूने मेडिकलमध्ये एक रुग्ण दगावला. जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांनी दिली.
मांढळ येथे नियमित आरोग्य अधिकारी देण्यात यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. या समितीची पुढील बैठक येत्या ७ दिवसांत घेण्यात यावी, बैठकीत आरोग्यविषयक सर्व अहवाल सादर करावा, आरोग्यसेवेत कोणतीही हयगय होता कामा नये, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. बैठकीत आयएमएच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश वासे यांनी ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी दोन दिवस कार्यशाळा घेण्याची तयारी दर्शवली. डॉ. पिनाक दंदे व डॉ. अनुप मरार यांनी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्याची सूचना केली. जनमंचचे प्रभाकर खोंडे, संदीप कश्चप, डॉ. संजीव गोल्हर या अशासकीय सदस्यांनीही सूचना केल्या.

जिल्ह्य़ात १८ वैद्यकीय जागा रिक्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर जिल्ह्य़ातील असूनही जिल्ह्य़ातील आरोग्य विभागात तब्बल वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या १८ जागा रिक्त असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या जागा तातडीने भरण्याची मागणी आरोग्य विभागाने केली असून, त्या केव्हा भरल्या जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पालकमंत्री दोन दिवस जिल्ह्य़ातील एका गावात मुक्काम करून गावातील सोयी-सुविधांचा आढावा घेणार आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याने एक दिवस गावात राहावे, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या.