ग्राहकांना चार दिवसांत दिलासा मिळण्याची शक्यता

नागपूर : काही दिवसांपासून कळमन्याच्या कृषी उत्पन्न बाजारात समितीत कांद्याचा घाऊक भाव ८० ते ९० रुपयांवर गेल्याने किरकोळ बाजारात तो १२० रुपये किलोने मिळत होता. मात्र आता नव्या कांद्याची आवक वाढल्याने घाऊक बाजारात कांदा ६५ ते ७० रुपये खरेदी केला गेला. त्यामुळे आता कांद्याचा भाव कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. परंतु किरकोळ बाजारात अद्याप कांद्याचे भाव १२० रुपये कायम आहेत. पण येत्या तीन-चार दिवसात वाढीव दर कमी होतील, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे.

यंदा परतीच्या पावसामुळे कांदा शेतीचे मोठे नुकसान झाले. अगदी काढणीला आलेला कांदा पाण्याखाली गेला. परिणामी मागणीच्या तुलनेत उत्पादनात घट झाली आणि दर्जेदार कांदा बाजारातून नाहीसा झाला. दररोजच्या आहारात सर्वात महत्त्वाचा असलेल्या कांद्याने अनेकांचे बजट बिघडवले. गेल्या पंधरा दिवसांपासून नागपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक अर्ध्यावर आली आहे. नागपुरात धुळे, जळगाव, नाशिकमधून मोठय़ा प्रमाणात कांदा येतो. पण तुटवडय़ामुळे मात्र यंदा कर्नाटक, आंध्रप्रदेशातूनही कांदा बाजारात आला. बाजारात दररोज वीस ते पंचवीस ट्रक कांदा येतो. काही दिवसांपासून कांद्याची आवक कमी झाली होती. त्यामुळे ठोक व्यापाऱ्यांना कांदा ८० ते ९० रुपये प्रतिकिलोने खरेदी करावा लागत होता. त्यामुळेच किरकोळ बाजारात कांद्याचा दर सव्वाशे रुपयांवर गेला.

आता बाजारात नाशिक, औरंगाबाद, धुळे आणि अहमदनगर येथून मोठय़ा प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. त्याशिवाय दिल्ली, आग्रा येथे इराण, अफगाणिस्तानातून कांदा येत असल्याने एकंदरीत देशातील बाजारात फारसा तुटवडा जाणवत नव्हता. मात्र दर्जेदार कांद्याची आवक कमी झाली होती. त्यामुळे पुढील महिनाभर कांद्याचे भाव कमी होणार नाहीत, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. रविवारी आणि सोमवारी मागणीच्या तुलनेत अधिक कांदा बाजारात आल्याने भावही कमी झाले आहेत. कळमना बाजारात कांद्याला ६५ ते ७० रुपये किलो घाऊक दर मिळाला. त्यामुळे आता नागपूरकरांना दिलासा मिळणार असे चित्र आहे.पण किरकोळ बाजारातील आधी खरेदी केलेला कांदा अजूनही १०० ते १२० रुपये दरानेच विकला जात आहे. पुढील दोन दिवसात किरकोळ बाजारातही कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता असून तेव्हाच स्वयंपाकगृहातील कांद्याचा वावर थोडा वाढणार आहे.

ओल्या दुष्काळामुळे खाद्य तेलाचे भाव वधारले

ओल्या दुष्काळामुळे तेलबियांचे उत्पादन कमी झाल्याने खाद्य तेलाचे भाव वधारले आहेत.  सोयाबीन आणि पाम तेलाचे प्रति पिंप थेट शंभर रुपयांनी वाढले आहे. गेल्या आठवडय़ात सोयाबीन तेल १३०० ते १३५० रुपये प्रति पिंप विकले गेले होते. मात्र सध्या त्याच तेलाच्या दरात थेट शंभर रुपयांची भर पडली असून सोयाबीन तेल प्रति पिंप १४०० ते १४५० रुपयांवर पोहचले आहे.  पामोलिन तेल १३०० ते १३२० रुपये प्रति पिंपवर पोहचले आहे. शेंगदाणा तेल २० ते ३० रुपये प्रति पिंप महागले आहे. थंडीत सरसो आणि तिळ तेलाची मागणी वाढत असते. त्यामुळे या हे तेल देखील २०,३० रुपयांनी महागले आहे.

महाग कांद्यामुळे चनापोहेही महागले

न्याहारी राजासारखी आणि रात्रीचे जेवण फकिरासारखे असावे, अशी जुनी म्हण आहे.  म्हणजे सकाळी भरपूर नाश्ता केला पाहिजे. यातून दिवसभरासाठी भरपूर ऊर्जा मिळते. मात्र कांदा महाग झाल्यामुळे चौकाचौकात मिळणारे नागपूरकरांचे आवडते चनापोहे महागले आहेत. पोहयांयासोबत  कांदा हवा असेल तर नाश्त्यासाठी दुपटीने पैसे मोजावे लागत  आहेत. शहरात चना-पोहा किंवा बटाटेवडय़ाचा आस्वाद घेणारी मंडळी मोठय़ा प्रमाणात आहेत.  परंतु एरव्ही ४० ते ५० रुपये किलोने मिळणारा कांदा १८० च्या घरात पोहचल्यामुळे  पोहयातून कांदे गायब झाले आहेत. बडकस चौकातील केशव टी स्टॉल, नंदनवन भागातील युफेरिया, तिरंगा चौकातील संजय नास्ता सेंटर, इतवारीतील महेश चनापोहा नास्ता सेंटर येथे वरून कांदा हवा असेल तर ५ ते ७ रुपये जास्त मोजावे लागत आहेत. काही विक्रेते कांद्याऐवजी डाळिंबाचे दाणे टाकत आहेत. अनेक दुकानदारांनी  तर पोह्य़ात कांदा टाकणेच बंद केले आहे.

कांद्याची आवक वाढली आहे. दोन दिवसांपासून कांदा ६५ ते ७० रुपये किलो खरेदी केला गेला. राज्यातील काही भागात कांद्याचे चांगले उत्पादन झाले असून नागपुरात पुढील दोन दिवसात कांद्याचे दर स्थिरावतील.

– जयप्रकाश वासाणी, अध्यक्ष कांदा बटाटा असोसिएशन कळमना.