विद्यार्थ्यांच्या लाखो जागा रिक्त; शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ

देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : राज्यात शहरी भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेशामुळे विद्यार्थ्यांच्या हजारो जागा रिक्त राहत असून याचा फटका महाविद्यालयांना बसतो आहे. मागील वर्षांत मुंबईमध्ये १ लाख ८ हजार, पुण्यात २७ हजार तर नागपुरात २१ हजारांवर अकरावीच्या जागा रिक्त होत्या. ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेमुळे शिकवणी वर्गानी आपला मोर्चा शहरालगतच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांकडे वळवला आहे. परिणामी, शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही धोक्याची घंटा ठरत असून येथील शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती या शहरांतील महानगरपालिका क्षेत्रात अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. मात्र, दोषपूर्ण प्रक्रियेमुळे याला मोठय़ा प्रमाणात विरोध होत आहे. इंग्रजी शाळांचे वाढते वलय लक्षात घेता मराठी  शाळांना आता घरघर लागली असून प्राथमिक आणि माध्यमिकच्या शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. यामुळे दरवर्षी शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरत असून समायोजनाची डोकेदुखी वाढली आहे. यात आता कनिष्ठ महाविद्यालयांचाही समावेश होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हा संभाव्य धोका ओळखूनच अनेक कनिष्ठ महाविद्यालयांची सध्या स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मागील काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा ओढा हा सीबीएसई शिक्षणाकडे वळला आहे. त्याचा फटका कनिष्ठ महाविद्यालयांना बसत आहे. मागील दोन वर्षांतील राज्यातील अकरावी प्रवेशातील रिक्त जागांची संख्या पाहता पुढील वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक समायोजनाचा प्रश्न गंभीर होण्याची दाट शक्यता आहे. मागील वर्षी  मुंबई विभागात अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १ लाख ०८ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यात सर्वात जास्त विज्ञान शाखेच्या ४६,९२०, त्यानंतर वाणिज्यच्या ४२,५२३ तर कला शाखेच्या १६,२२४ जागा रिक्त होत्या. अशीच स्थिती पुणे, नागपूर व अन्य शहरातील होती. यंदाही अकरावी  प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून उपराजधानीतील ५९ हजार जागांसाठी केवळ ३८ हजार अर्ज आले आहेत.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केवळ महापालिकेच्या हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच राबवण्यात येत असल्याने शहर सीमेला लागून असलेल्या स्वयंअर्थसहाय्यित व विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिकवणी वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थी प्रवेश घेतात. त्याचा परिणाम शहरातील महाविद्यालयांवर होतो. त्यामुळे ही प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यांमध्ये राबवण्यात यावी अथवा शहरातून रद्द करावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

 रवींद्र फडणवीस, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ.

२०१९ मधील रिक्त जागा

शहर      प्रवेश क्षमता                   प्रवेश निश्चिती           रिक्त जागा

मुंबई     ३ लाख २६ हजार              २ लाख १८                  १ लाख

पुणे       १ लाख ४ हजार                  ६३,५६६                    २७ हजार

नाशिक  २३ हजार ८६०                  १५,३००                     ८ हजार

नागपूर  ५८ हजार ७६०                  ३७,७००                     २१ हजार