आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना लाभ

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर विभागांमध्ये सध्या ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्यांना इंटरनेट, स्मार्टफोन व इतर उपकरणांचा खर्च करणे अशक्य आहे. त्यामुळे अशा आर्थिक मागास विद्यार्थ्यांना स्वत:च्या खर्चाने ई-लर्निंगसाठी आवश्यक सुविधा देण्याचे विद्यापीठाच्या विचाराधीन असून यासाठी विधी सदस्य डॉ. ओमप्रकाश चिमणकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली. तेव्हापासून विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग व महाविद्यालयांना ऑनलाईन वर्गातून शिक्षण देण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र, आर्थिक स्थिती बिकट असल्याने अनेक विद्यार्थी हे ऑनलाईन वर्गापासून वंचित आहेत.

काही विधिसदस्यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर हा विषय विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळासमोर आला. त्यानंतर बैठक घेत विद्यार्थ्यांना कशाप्रकारे सुविधा देता येतील, यावर निर्णय घेण्यासाठी समिती गठित करण्यात आली.

डॉ. ओमप्रकाश चिमणकर  यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात  ७ सदस्यीय समिती गठित केली  असून समितीला ४५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ई-सामग्री सेवा सुरू

करोनामुळे नागपूर विद्यापीठाने शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने आपल्या संकेतस्थळावर ई-सामग्री उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत शिक्षकांनी ई-सामग्री सेवेमध्ये त्यांचे चित्रफित व अभ्यासाचे साहित्य देण्यात आले आहे.  विद्यार्थ्यांनी या सुवधिांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.