|| ज्योती तिरपुडे

अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा गवगवा होत असला तरी ही प्रक्रिया निव्वळ देखावा असून खासगी शिकवणी वर्ग सांगतील त्याच ठिकाणी विद्यार्थी प्रवेश घेत असल्याचे चित्र कायम आहे. विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील प्रवेश नाकारून सेंट पॉलला प्रवेश घेतला कसा? आणि तरीही त्यांची नावे यादीतून बाद झाली कशी नाहीत? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

अकरावी प्रवेश समिती असली तरी विद्यार्थी पाहिजे त्याच ठिकाणी प्रवेश घेत असून खासगी शिकवणी वर्गावर विश्वास ठेवून ते नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांनाही नाकारत आहेत. डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील सुबोध मेश्राम, मयूरी सुभाष तोडास या विद्यार्थ्यांनी ‘फिशरीज’ला तर आणि मोहित कुंभारे याने इलेक्ट्रॉनिक्सला प्रवेश घेतलेला नाही.

समितीने पाठवलेल्या यादीमध्ये या तिघांचे नाव होते. मात्र, त्यांनी सेंट पॉलमध्ये प्रवेश घेतले आहेत. कारण टय़ुशन क्लासेसने तसे सांगितल्याचे सुबोध आणि मयूरीच्या पालकांनी सांगितले.

त्यामुळे ज्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी केंद्रीय समिती विद्यार्थ्यांची यादी पाठवते, त्या ठिकाणी विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश न घेता इतरत्र प्रवेश निश्चित करीत असतील तर समिती औचित्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. गुरुवारी आणि शुक्रवारी द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीचे प्रवेश करण्यासाठी समितीने यादी पाठवली.

गेल्यावर्षी साधारण विज्ञान आणि द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश एकत्रच करण्यात आल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता. अनेक पालक नाराज झाले होते आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्यवस्थापनांशी वाद घातले.

तसेच अनेक विद्यार्थी रडले देखील होते. अशी कोणतीही परिस्थिती यावर्षी नाही. द्विलक्षी अभ्यासक्रमाचे स्वतंत्र प्रवेश होत असून त्यानंतर साधारण विज्ञान शाखेसाठी प्रवेश होणार आहेत.

ज्या कनिष्ठ महाविद्यालयातून व शाळांमधून विद्यार्थ्यांनी माझ्या शाळेत प्रवेश घेतला असेल त्यांनी कदाचित सीबीएसईला प्रवेश घेतला असावा. कारण सीबीएसईला ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नाही. तसेच १० टक्के व्यवस्थापन कोटा आहे. व्यवस्थापन कोटय़ाची माहितीही ऑनलाईन अपलोड करावी लागते. – डॉ. राजाभाऊ टाकसाळे, संचालक, सेंट पॉल हायस्कूल

एका महाविद्यालयाच्या यादीत नाव असताना विद्यार्थी इतरत्र प्रवेश घेईल, असे होऊच शकत नाही. कारण पहिल्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबरोबर त्याचे नाव यादीतून बाद होते. विद्यार्थी खोटे बोलत असावेत किंवा संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांशी त्यांची बोलणी झाली असावी, पण प्रत्यक्षात त्यांनी प्रवेश घेतले नसावेत. तसेच शाळा किंवा त्या त्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ‘इनहाऊस कोटा’व व्यवस्थापन कोटा आहे. त्यानुसार ते प्रवेश घेऊ इच्छित असतील. – सतीश मेंढे, सहाय्यक संचालक

अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच काही विद्यार्थ्यांनी इतरत्र प्रवेश केल्याचे सांगितले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी होतात, असे नाही. जर तिकडे प्रवेश झाले असतील तर आमच्या यादीत त्यांचे नाव यायला नको होते. तरीही त्यांची नावे आली. विद्यार्थ्यांना विचारणा केल्यावर त्यांनी इतरत्र प्रवेश घेतल्याचे सांगितले. आमच्याकडे सध्या अडचण एकच आहे की आम्ही सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकत नाहीत. हीच पालकांना अडचण वाटते.  – प्रा. कबीर रावळेकर, उपप्राचार्य, डॉ. आंबेडकर महाविद्यालय