करोनामुळे विद्यापीठाचा निर्णय

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये संशोधन करण्यास इच्छुक असणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाईन पेट’चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. करोनामुळे विदेशी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विद्यापीठात येणे अशक्य होणार असल्याने विद्यापीठाने हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

पीएच.डी.अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘पेट’चे १० ते १५ मेदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यासाठी २४ एप्रिलपर्यंत नोंदणी करावयाची आहे. विद्यापीठाच्या पाली व प्राकृत अभ्यासक्रमाला विदेशी विद्यार्थी आजही प्रवेश घेतात. त्यात दुबई, म्यानमार, भुटानसाख्या आशियाई देशातील विद्यार्थ्यांचा समावेश असतो.

यातील बहुतांश विद्यार्थी ही पीएच.डी. करणार आहेत. यंदा करोनाचा प्रादुर्भाव असल्याने विदेशी विद्यार्थ्यांना पीएच.डी. देणे शक्य होणार नाही. त्यामुळे विद्यापीठाने विदेशी विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाईन पेट’चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठीही अशी सोय उपलब्ध करून देण्यावर विचार सुरू असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे विद्यापीठामध्ये संशोधनासाठी इच्छुक असणाऱ्या बाहेरील विद्यार्थ्यांना चांगली संधी उपलब्ध होणार आहे.