सहभागी होणाऱ्यांसाठी ‘सॉफ्टवेअर’ विकसित
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने पाणवठय़ावरील वन्यप्राणिगणनेत सहभागी होण्यासाठी ‘सॉफ्टवेअर’ तयार केले असून, गणनेत सहभागी होण्याची प्रक्रिया पारदर्शक केली आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
राज्यातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये बुद्धपौर्णिमेला होणारी पाणवठय़ांवरील वन्यप्राणिगणना म्हणजे हौशी आणि वन्यजीवप्रेमी पर्यटकांसाठी पर्वणी असते. यात सर्वानाच सहभागी करून घेण्याचा वनखात्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी हौशी आणि वन्यजीवप्रेमींकडून अर्ज मागवले जातात. वनखात्याच्या कार्यालयात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यानंतर कोणाला कोणत्या पाणवठय़ावर पाठवायचे, याचा निर्णय संबंधित वनाधिकारी घेतात. बरेचदा वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी सलगी दाखवून ज्या पाणवठय़ावर सर्वाधिक प्राणी येतात, त्यावरील मचाण आपल्याला मिळावे यासाठी प्रयत्न हौशी व वन्यजीवप्रेमी करतात.
कित्येकदा क्षमतेपेक्षा अधिक जणांना या गणनेत सहभागी करून घेतले जाते. ही सर्व प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची, अपारदर्शक असल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने त्यावर तोडगा काढला आहे. व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांतील सफारीसाठी ऑनलाइन प्रयोग होत असताना त्यांनी पाणवठय़ांवरील प्राणिगणनेत सहभागी होण्यासाठीसुद्धा ऑनलाइन प्रणाली तयार केली आहे.
रेल्वेखात्याच्या सॉफ्टवेअरप्रमाणेच हे सॉफ्टवेअर असून, गणनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना आता प्रत्यक्ष वनखात्याच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. http://www.mahamelghattiger.com या संकेतस्थळावर जाऊन अर्जात नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, मेळघाटात जेथे सहभागी व्हायचे आहे त्या स्थळाचे नाव, स्वत:चे छायाचित्र, निवासी पत्ता असलेला पुरावा एवढी माहिती भरायची. ही माहिती संकेतस्थळावरील अर्जात भरल्यानंतर तुम्हाला वन्यजीव गणनेत कोणते स्थळ दिले आहे, यासंदर्भातील लघूसंदेश भ्रमणध्वनीवर येईल. याप्रमाणे कोणत्या स्थळावर किती जागा शिल्लक आहेत, कोणते स्थळ पूर्ण झाले आहे, हे सर्व या संकेतस्थळावर पाहायला मिळेल. गणनेच्या दिवशी संकेतस्थळावर भरलेल्या अर्जाची प्रत घेऊन वनखात्याच्या कार्यालयात येण्याची गरज नाही, तर तुम्हाला कोणत्या ठिकाणी पोहोचायचे आहे, त्याचा संदेश भ्रमणध्वनीवर येईल आणि तेथे पोहोचल्यानंतर सरकारी वाहनाने नियोजीत ठिकाणावर तुम्हाला पोहोचविले जाईल.

‘निसर्गप्रेमींनी सहकार्य करावे’
निसर्गप्रेमींना सोईचे जावे व कागदविरहित कामकाजाच्या दृष्टीने आम्ही एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. पाणवठय़ांचे वितरण स्वयंचलित पद्धतीने यात होणार आहे. यासाठी निसर्गप्रेमींनी सहकार्य करावे, असे आवाहन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव गुन्हे शाखेचे परिक्षित डंभारे यांनी केले आहे. वन्यप्राण्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेऊनच प्राणिगणनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन वन्यजीवप्रेमी यादव तरटे पाटील यांनी केले आहे.