पूर्व विदर्भातील आरोग्य विभागाच्या रुग्णालयांची स्थिती; नऊ महिन्यात ७.५७ टक्के बालकांचा मृत्यू

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांत अत्यवस्थ  नवजात बालकांवर उपचारासाठी एसएनसीयू विभागात केवळ १८४ खाटा आहेत. तरीही येथे नऊ महिन्यात तब्बल ७ हजार ९७७ अत्यवस्थ बालकांवर उपचाराची नोंद करण्यात आली आहे. त्यातील ७.५७ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूचे प्रमाण जास्त असण्याला येथे क्षमतेहून जास्त बालकांवर उपचार व सुविधांचा अभाव, हे कारण आहे काय, असा प्रश्न ही आकडेवारी बघून उपस्थित केला जात आहे.

पूर्व विदर्भात सर्वाधिक ४२ खाटा गडचिरोलीत तर सर्वात कमी १२ खाटा वर्धा जिल्ह्य़ात आहेत. १ एप्रिल २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या नऊ महिन्यांच्या कालावधीत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ात कमी वजन, इतर कारणांमुळे ७ हजार ९७७ बालकांवर उपचार झाले. यापैकी ६०४ बालकांचा मृत्यू झाला. दरम्यान कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अ‍ॅण्ड डिसॅबिलिटी (कोमहाड)च्या निरीक्षणानुसार, जन्मजात बाळाचे वजन एक ते दीड किलो असल्यास त्याला प्रसंगी एक ते दीड महिने एसएनसीयूत  ठेवावे लागते. दीड ते दोन किलो वजनाच्या बाळाला १५ ते २० दिवस आणि दोन ते अडीच किलो वजनाच्या बाळाला ७ ते १५ दिवसही ठेवावे लागू शकते.   त्यामुळे पूर्व विदर्भात १८४ खाटांवर तब्बल आठ हजार बालकांवर उपचार झाल्याची संख्या ही क्षमतेहून जास्त बालकांवर उपचार झाल्याचे दर्शवते. यातून  एकाच खाटेवर जास्त बालकांना ठेवून उपचार झाल्याचेही स्पष्ट होते. याबाबत आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. अर्चना पाटील व डॉ. साधना तायडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

एका खाटेवर जास्त बाळांमुळे संसर्गाचा धोका

एका खाटेवर एकाच  बालकावर उपचार व्हायला हवा. अधिक बालकांवर संसर्गाचा धोका असतो.  एक ते दीड किलो वजनाच्या नवजात बाळाला एक ते दीड महिने, दीड ते दोन किलो वजनाच्या बाळाला १५ दिवस तर इतरही कारणांमुळे एसएनसीयूत उपचार घ्यावा लागू शकतो. औषधांच्या परिणामानुसार हा कालावधी कमीही होऊ शकतो.’’

– डॉ. प्रवीण खापेकर, बालरोग तज्ज्ञ.

‘‘विदर्भासह नागपूर विभागात होणाऱ्या  एकूण प्रसूतींपैकी सुमारे ३५ टक्के प्रसूतींमध्ये कमी वजनाची बालके जन्मतात. या बालकांवर उपचारासाठी  दर्जेदार सेवा हव्या. परंतु कोणत्याही पक्षाचे सरकार असो ते दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष करते. १८४ एसएनसीयूच्या खाटांवर आठ हजार बालकांवर उपचार हे क्षमतेहून जास्त मुलांना येथे ठेवले जात असल्याचे दर्शवते.  ’’

– डॉ. उदय बोधनकर, कार्यकारी संचालक,

कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अ‍ॅण्ड डिसॅबिलिटी.

‘एसएनसीयू’च्या मंजूर खाटा व रुग्णांची स्थिती

(१ एप्रिल २०२० ते ३१ डिसेंबर २०२०)

जिल्हा            खाटा          दाखल रुग्ण   मृत्यू    प्रमाण (टक्क्यांमध्ये)

वर्धा                 १२                ४७९         २४               ५.०१

भंडारा              ३६               १४४१        ९९                ६.८७

चंद्रपूर              १६                २०७०      २४०            ११.५९

गडचिरोली         ४२              १६१०      १४३                ८.८८

नागपूर             ४२               १३३२       १८                १.३५

गोंदिया             ३६                ०४५         ८०            ७.६६

एकूण              १८४            ७९७७         ६०४             ७.५७