प्रत्यक्षात शहरात एकच महिला पोलीस निरीक्षक

आज महिलांनी सर्व क्षेत्र पादाक्रांत केली असून, आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. देशात सर्वाधिक महिला पोलीस असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. त्यामुळे आज महाराष्ट्र पोलीस दलात मोठय़ा उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला. परंतु पोलीस विभागात महिला अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने कनिष्ठ महिला अधिकाऱ्यांना एक दिवसाचा मुख्यमंत्रीप्रमाणे ‘एक दिवसाचे पोलीस निरीक्षक’ करण्यात आले. आज नागपूर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील जबाबदारी महिलांकडे सोपविण्यात आली. त्यामुळे पोलीस ठाण्यांमध्ये एक दिवसाकरिता ‘महिला राज’ होते.

नोकरीमध्ये महिलांना किमान ३३ टक्के आरक्षणाचा नियम असला तरी त्याची पोलीस दलात अद्यापही पूर्तता झालेली नाही. राज्यातील पोलीस दलात केवळ साडेअकरा टक्के महिला पोलीस असल्याचे सीआयडीच्या ‘महाराष्ट्रातील गुन्हेगारी २०१४’ च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकीकडे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना महिला पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत असली तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे.

महिला पोलिसांची संख्या वाढविण्यासाठी ठोस पावले उचचली जात नसल्याचे दिसत आहे. राज्यात २०१४ च्या अखेर दोन लाख १२ हजार १३१ पोलीस मनुष्यबळ मंजूर होते. एक लाख लोकसंख्येमागे १७० पोलीस असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. राज्यात दोन लाख पोलिसांमध्ये केवळ २२ हजार ९९८ महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या आहे. नागपुरात एक हजार ८ महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यापैकी केवळ एकच महिला पोलीस निरीक्षक आहे. यावरून पोलीस दलात महिलांचा टक्का वाढविण्याची निंतात आवश्यकता आहे.

पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यभरातील पोलीस ठाण्यांमध्ये महिला दिन साजरा करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी ठाण्यांमधील महिला पोलिसांकडे महत्वाची जबाबदारी सोपविण्यात यावी आणि त्यांना प्रोत्साहित करावे असे सांगण्यात आले. सर्व पोलीस ठाण्यांचे प्रमुख पुरुष आहेत. त्यामुळे आज शहरातील सीताबर्डी, अंबाझरी, हिंगणा एमआयडीसी, वाडी, सोनगाव, राणाप्रतानगर, धंतोली, अजनी, इमामवाडा, सक्करदरा, नंदनवन, हुडकेश्वर, सदर, गिट्टीखदान, पाचपावली, जरीपटका, कोराडी, माणकापूर, कोतवाली, लकडगंज, तहसिल, गणेशपेठ, कळमना, यशोधरानगर या पोलीस ठाण्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक महिला अधिकाऱ्यांकडे पोलीस निरीक्षकाचा पदभार सोपविण्यात आला.  याशिवाय स्टेशन डायरीपासून ते पोलीस ठाण्यातील सर्व कामांची जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आली होती. त्यामुळे आज शहर पोलीस ठाण्यांमध्ये एक दिवसाचे ‘महिला पोलीस राज’ बघावयास मिळाले. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहपोलीस आयुक्त राजवर्धन, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, प्रभारी अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी सर्व महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ग्रामीणमध्येही महिलाच प्रमुख

नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाशी निगडित २४ पोलीस ठाण्यात महिला दिन साजरा करण्यात आला. या सर्व पोलीस ठाण्यांमध्येही कनिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षक करण्यात आले. याशिवाय इतर कामांचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.