जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्य व केंद्र सरकारने प्रत्येक समाजाला समान न्याय दिला असून कुणावरही गेल्या पाच वर्षांत अन्याय करण्यात आला नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने खुल्या गटातील जागा वाढवण्यासोबत त्यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील प्रतापनगर चौकात आज बुधवारी आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, संदीप जोशी, भूपेश थुलकर, मुन्ना यादव उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्येक समाजातील घटकाला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यामुळे आरक्षण देताना कुणाच्याही जागा कमी करणार नाही.  खुल्या गटासाठी २०१८ मध्ये जेवढय़ा जागा मिळाल्या होत्या, त्याच्यापेक्षा जास्त जागा मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. खुल्या गटासाठी लवकरच आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले जाणार आहे. ओबीसी समाजासाठी ३५०० कोटी मंजूर केले आहेत. शिष्यवृत्ती योजना तयार केली आहे. खासगी संस्थेत प्रत्येक घटकाला ५० टक्के जागा देण्यात येतील. मुले शिकली तर तीच देशाला पुढे घेऊन जातील. तुमच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करु शकलो. त्यामुळे मतदारसंघात वेळ देता आला नाही. पण तुम्ही मला सांभाळून घेतले.  राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. आपल्या समोर जे काही राजकीय पक्षाचे उमेदवार आहेत त्यांची परिस्थिती काय आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी राहिले नाही. काँग्रेस आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षांत जी कामे केली त्यांच्या दुप्पट विकास कामे पाच वर्षांत आम्ही केली.

काँग्रेसने त्यांच्या काळात काय केले याचा हिशोब द्यावा नाही तर मी पाच वर्षांत काय केले ते जाहीरपणे सांगतो, असे आव्हान त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिले.  निवडणुकीला पाच दिवस राहिले असून या निवडणुकीतील मतदारसंघातील ही शेवटची सभा आहे. त्यामुळे प्रत्येकाने देवेंद्र फडणवीस समजून मतदारसंघात काम करा आणि विरोधी पक्षातील उमेदवाराची अमानत रक्कम जप्त होऊ द्या, असे आवाहन त्यांनी केले.

बुद्धिजीवींशी संवाद

निवडणुकीच्या धामधुमीत नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी समाजातील बुद्धिजीवी वर्गाशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा घडवून आणली. जेरील लॉन येथे सायंकाळी सुरू झालेल्या या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहून राज्यातील विविध समस्या आणि मागासवर्गीच्या प्रश्नांवर चर्चा केली. तसेच विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तर दिले. प्रलंबित योजना लवकरच मार्गी लावू, असे आश्वासनही दिले. अतिशय खेळीमेळीच्या या चर्चेत शहर विकास आणि शैक्षणिक क्षेत्रातील योजनांबाबत चर्चा झाल्याचे कार्यक्रमाचे आयोजक डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. अतिशय व्यस्त कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले. या बैठकीला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.