पोलीस महासंचालकांचे आदेश नागपुरात धडकले, ‘जेलब्रेक’ प्रकरणात निलंबित

‘जेलब्रेक’ प्रकरणात निलंबित करण्यात आलेले आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक वैभव कांबळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी गृह विभागाला तब्बल दीड वर्षे विचार करावा लागला. अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) त्यांची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसे पत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकांनी नागपूर ‘एसीबी’ अधीक्षकांना पाठविले आहे.

३१ मार्च २०१५ च्या मध्यरात्री नागपूर मध्यवर्ती कारागृहातून ‘मोक्का’चे पाच कैदी फरार झाले होते. राज्यातील अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या नागपूरच्या कारागृहाची सुरक्षाव्यवस्था भेदण्यात कैद्यांना यश आल्याने, संपूर्ण राज्य सरकारच्या कारभारावर व कारागृहांच्या सुरक्षेवर प्रष्टद्धr(२२४)्नाचिन्ह निर्माण करण्यात आले होते. या घटनेनंतर राज्य सरकार खळबळून जागे झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने तत्कालीन कारागृह अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित करण्यात आले होते. सध्याही ते निलंबित आहेत. या प्रकरणात जवळपास ११ अधिकारी निलंबित झाले होते. तर त्यापेक्षा अधिकांची बदली इतरत्र करण्यात आली होती.

या घटनेनंतर राज्य सरकारने माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या नेतृत्वात राज्यातील कारागृहांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमली होती.

या समितीने नागपूर मध्यवर्ती कारागृहाची चौकशी केली असता अनेकांनी वैभव कांबळे हे मनमानी कारभार करीत होते असा आरोप केला होता. तसेच त्यांच्या सहकर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले. त्यामुळे कांबळे यांच्याविरुद्ध ‘एसीबी’कडून कारवाई करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही त्यांच्याविरुद्ध एसीबीकडून कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण विस्मरणात गेले होते.

मात्र, दीड वर्षांनी का होईना एसीबीला जाग आली आणि पोलीस महासंचालकांनी कांबळे यांची खुली चौकशी करण्याचे आदेश नागपूर एसीबीच्या अधीक्षकांना दिले, अशी विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली.

संपत्तीवर येणार टांच

पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर कांबळे यांची चौकशी करण्यासाठी ‘एसीबी’चे अधीक्षक संजय दराडे यांनी एक पथक तयार करण्यात आल्याची माहिती आहे. या पथकाकडून कांबळे यांची स्थावर मालमत्ता, बँक खाती, बँक लॉकर, शेअर्स, म्युच्युअल फंड आदींचा लेखाजोखा मागविण्यात आला आहे. याशिवाय त्यांची मिळकत आणि एकूण मालमत्ता यांचा हिशेब त्यांना सादर करावा लागणार आहे. मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती सापडली तर त्यांच्या संपत्तीवर टांच येणार आणि फौजदारी गुन्हाही दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चौकशी प्रारंभ

पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर वैभव कांबळे यांची खुली चौकशी सुरू करण्यात आली आहे. एसीबीने त्यांना अनेक प्रकारची माहिती मागितली असून खुली चौकशी असल्याने ती पूर्ण होण्यासाठी वेळ द्यावा लागेल.

– संजय दराडे, अधीक्षक,  एसीबी, नागपूर.