शिधावाटप दुकानांकडून नियमभंग

चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

नागपूर : एखाद्या गोष्टीसाठी सर्वसामान्य नागरिकांना सरकारकडे पाठपुरावा करावा लागणे यात काहीही नाविन्य नाही. मात्र सरकारवरच ही वेळ यावी यातून यंत्रणेचे अपयश दिसून येते. राज्यातील रेशन दुकाने ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे उघडावी म्हणून अन्न व नागरी पुरवठा खात्यावर वारंवार आदेश जारी करण्याची वेळ आली आहे.

फेब्रुवारी २००२ ते मार्च २०२० या १८ वर्षांत रेशन दुकानदारांनी वेळेत दुकाने उघडावी म्हणून खात्याला चारवेळा आदेश जारी करावे लागले आहेत. नुकताच ९ मार्चला एकत्रित आदेश जारी करून एक महिन्यात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.

राज्य शासनाकडून सवलतीच्या दरात धान्य पुरवठा व इतर काही वस्तू स्वस्त: धान्य दुकानाच्या माध्यमातून केला जातो. नियमाप्रमाणे ही दुकाने सकाळी व सायंकाळी प्रत्येकी चार तास म्हणजे आठ तास उघडी असायला हवी. त्याचप्रमाणे ज्या गावात आठवडी बाजार भरत असेल त्या दिवशी आणि औद्योगिक वसाहत क्षेत्रात कामगारांच्या सुटीच्या दिवशी दुकाने उघडी ठेवणे बंधनकारक आहे. दुकानाची वेळ, उपलब्ध धान्याच्या साठा दुकानाच्या दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. मात्र या नियमांचे पालन दुकानचालक करीत नाही. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा खात्याने सर्वप्रथम २१ फेब्रुवारी २००२ ला आदेश जारी करून कारवाईचा इशारा दिला. मात्र त्यानंतरही सुधारणा न झाल्याने ११ एप्रिल २०१९ ला जारी करण्यात आला. दोनच महिन्याने म्हणजे ११ मे २०१९ ला पुन्हा आदेश काढण्यात आला. या उपरही दुकान चालकांकडून नियमांचे उल्लंघन होतच राहिले. नुकताच ९ मार्च रोजी पुन्हा नव्याने एकत्रित आदेश जारी केला आहे.

नागपूर जिल्ह्य़ात एकूण ११ लाख ७५ हजार ८७९ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना ३३ हजार ८७३ दुकानांमधून सवलतीच्या दरातील गहू आणि तांदूळ मिळून एकूण १५ हजार ५३० मे.टन धान्याचे वाटप केले जाते हे येथे उल्लेखनीय.