अनेक वर्षांपासून कार्यरत अंशकालीन प्राध्यापकांचा आरोप

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ९० पेक्षा अधिक कंत्राटी प्राध्यापकांची अकरा महिन्यांसाठी यावर्षी नियुक्ती केली. मात्र, या कंत्राटी भरतीमध्ये अनेक वर्षांपासून विभागांमध्ये सेवा देणाऱ्या अंशकालीन प्राध्यापकांना डावलत केवळ मर्जीतील उमेदवारांची निवड करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

राज्य शासनाने विद्यापीठांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवर बंदी घातली आहे. त्याचा फटका शैक्षणिक गुणवत्तेला बसत असल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून मागील वर्षीपासून कंत्राटी प्राध्यापकांची भरती केली जात आहे.

विद्यापीठात चाळीसहून अधिक विभाग आणि तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. यापैकी बऱ्याच विभागांमध्ये तासिका तत्त्वावर कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. महत्त्वाचे म्हणजे बऱ्याच विभागांमध्ये दहा ते पंधरा प्राध्यापक तासिका तत्त्वावर काम करताना दिसून येत होते.

विद्यापीठाच्या तीन महाविद्यालयांची स्थिती जवळपास तीच आहे. लक्ष्मीनारायण तंत्रशिक्षण संस्था (एलआयटी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालय आणि बॅरि. एस.के. वानखेडे शिक्षण महाविद्यालयात सर्वाधिक तासिका तत्त्वावर प्राध्यापकांचा समावेश होता. त्यानुसार या प्राध्यापकांना ‘फु लटाईम वर्कलोड’ देत, त्यांना सहायक प्राध्यापकांचा दर्जा देण्याचा निर्णय विद्यापीठाने मागील वर्षी घेतला. त्यानुसार विद्यापीठाने यावर्षीही ९०हून अधिक कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये केली. मात्र, विभाग प्रमुखांनी या नियुक्त्या करताना जवळच्या व्यक्तींनाच संधी देत अनेक वर्षांपासून तासिका तत्त्वावर विभागांमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापकांना डावलण्यात आल्याचा आरोप होत आहे. परिणामी, अनुभव कमी असतानाही मर्जीतील प्राध्यापक विद्यार्थ्यांचे वर्ग घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना आता पुस्तकी ज्ञानावर अवलंबून रहावे लागत असल्याचे चित्र आहे.