चंद्रशेखर बोबडे

करोनामुळे कौशल्य विकास व उद्योजगता विभागाचे रोजगार मेळावे ऑनलाईन घेतले जात असले तरी मुलाखती दरम्यान उद्योजक, कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सुशिक्षित बेरोजगारांशी प्रत्यक्षात संवाद होत नसल्याने याचा परिणाम नोकर भरतीवर होऊ लागला आहे. मागील चार महिन्यांत विभागाकडून झालेल्या चार रोजगार मेळाव्यातून  केवळ ४५ चोवीस बेरोजगारांना काम मिळाले आहे.

कौशल्य विकास व उद्योजगता विभागाच्या माध्यमातून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी  रोजगार मेळावे आयोजित केले जातात. यात विभागाकडे नाव नोंदवलेल्या सुशिक्षित बेरोजगारांसह  ज्यांना कुशल मनुष्यबळाची गरज आहे, असे उद्योजक, विविध कंपन्यांना निमंत्रित केले जाते. ते त्यांना हव्या असलेल्या मनुष्यबळाची निवड  करतात. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता,अनुभव  याची माहिती  प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून घेतली जाते. उमेदवाराचा आत्मविश्वास, देहबोली, कामाविषयी जाण आणि निकड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून कंपन्यांना किंवा उद्योजकांच्या प्रतिनिधींना कळते. अशाप्रकारे प्रत्येक मेळाव्यातून १०० ते १२५ बेरोजगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराची संधी मिळत होती. यंदा मात्र करोनाच्या साथीमुळे  हे रोजगार मेळावे ऑनलाईन झाले. यात उद्योजक व कंपन्यांच्या प्रतिनिधींचा उमेदवारांशी संपर्क हा ऑनलाईनच होतो. मुलाखतीही अशा प्रकारेच घेतल्या जातात. परंतु यातून अनेक गोष्टींची स्पष्टता होत नाही. याचा फटका नोकर भरतीला बसला आहे. नागपूरच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, मागील चार महिन्यांत चार रोजगार मेळावे झाले. एकूण १,४१४ जागांसाठी १४०५ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले, मुलाखती दिल्या. यापैकी प्राथमिक स्तरावर २९६ उमेदवारांची निवड झाली. यातून केवळ ४५ जणांना प्रत्यक्षात काम मिळाले. उर्वरित उमेदवारांना प्रतीक्षा यादीत समाविष्ट करण्यात आले.

यासंदर्भात विभागाचे सहायक संचालक प्रभाकर हरडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ऑनलाईन मेळाव्यांमुळे थोडा परिणाम होत असल्याचे मान्य केले. उमेदवार आणि विविध कंपन्यांच्या प्रतिनिधीत दूरध्वनीवरून संवाद होतो यात अनेक बाबी स्पष्ट होत नाही, असेही त्यांनी सांगितले. बेरोजगारासाठी विविध क्षेत्रातील रोजगारविषयक वेबिनार आयोजित करून आम्ही त्यांना माहिती देत आहोत.

मेळाव्यादरम्यान उमेदवार आणि कंपनी प्रतिनिधी यांच्यात प्रत्यक्ष संवाद होतो. यात दोन्ही बाजूंनी अनेक बाबींची स्पष्टता होते. ऑनलाईन मेळाव्यात ही उणीव आहे. जास्तीत जास्त बेरोजगारांना संधी मिळावी म्हणून आमचे प्रयत्न आहेत. या मेळाव्या  व्यतिरिक्त अनेक कंपन्या विभागाच्या माध्यमातून मनुष्यबळाची मागणी करीत आहेत. यातूनही अनेक बेरोजगारांना संधी मिळाली आहे.

– प्रभाकर, हरडे, सहायक संचालक, कौशल्य विकास व उद्योजगता विभाग, नागपूर</p>