शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीवरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गोंधळ घातल्याने दोन तासांतच पूर्ण दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. विधिमंडळाच्या प्रवेशद्वारातही विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संपूर्ण कर्जमाफी द्यायची नाही, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाम भूमिका असल्याने विरोधकांना चच्रेत सहभागी होण्याखेरीज अन्य पर्याय नसल्याने शेतकऱंची कर्जमाफी, दुष्काळग्रस्तांना मदत आदीं मुद्दयांवर गुरुवारपासून सुरळीत चर्चा सुरु होईल, असे अपेक्षित आहे.
विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास पुकारण्यात आल्यावर विरोधकांनी आपल्या जागा सोडून अध्यक्षांपुढील मोकळ्या जागेत धाव घेऊन घोषणाबाजी सुरु केली. कर्जमाफी च्या मागणीसह सरकारविरोधातील घोषणांचे फलक विरोधकांनी फडकावले व घोषणा दिल्या. केवळ फुकाच्या चर्चा न करता शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा तातडीने विधिमंडळात करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अजित पवार, जयंत पाटील आदींनी केली.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरु करता येईल, असे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले आणि विरोधकांनी गोंधळ न घालता कामकाज होऊ द्यावे, अशी विनंती केली. पण विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कागदपत्रांचे तुकडे करुन सभागृहात फेकण्यात येत होते. काँग्रेसबरोबरच राष्टरवादी काँग्रेसचे सदस्यही बुधवारी आक्रमक होते व कामकाज रोखण्याचा प्रयत्न करीत होते.
या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. तरीही लक्षवेधी सूचनांवरील चच्रेच्या वेळीही गोंधळ सुरु राहिल्याने प्रश्नोत्तरे व लक्षवेधी सूचनांवर कामकाज पार पाडल्यावर दिवसभरासाठी सभागृह तहकूब करण्यात आले.

आघाडीवर खापर
शेतकऱ्यांमध्ये गेल्या वर्षभरात नराश्य आले नसून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेल्या १५ वर्षांतील धोरणे व कारभारामुळे ते आले आहे, असा टोला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी लगावला. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत असून उपाययोजना सुरु आहेत. स्वस्त अन्नधान्य, जलयुक्त शिवार, सवलतीत गुरे उपलब्ध करुन देणे, उत्पादनखर्च कमी करण्यासाठी स्वस्तात बियाणे, खते व अन्य बाबी आणि कर्ज, विमा उपलब्ध करुन देणे, आदी दीर्घकालीन उपाययोजना सरकार करीत असल्याचे खडसे यांनी विधानसभेत सांगितले. विरोधी पक्षांना चर्चा न करता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांना राजकारण करायचे आहे, अशी टिप्पणी खडसे यांनी केली.