पवार यांच्या वक्तव्याचा विदर्भवाद्यांकडून निषेध

विदर्भाची मागणी ही केवळ अमराठी भाषिकांची असून ती केवळ पूर्व विदर्भातील काही जिल्ह्य़ातच आहे. या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचा विदर्भातील नेत्यांनी तीव्र विरोध केला.

पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात पवार यांची राज ठाकरे यांनी मुलाखत घेतली. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी वरील मत मांडले. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया विदर्भवादी नेत्यांमध्ये उमटल्या. अनेकांनी पवार यांच्या विधानाचा निषेध केला असून विदर्भाची मागणी स्थानिक लोकांची असल्याचा दावा केला. जनमताचा मुद्दा हा घटनेत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मागणीचा आधार विकास

विदर्भाबाबत हिंदी मराठी भाषिकांचा वाद हा पद्धशीरपणे गैरसमज पसरवणारा आहे. विदर्भात हिंदी व मराठी लोक नव्हे तर बंगाली , छत्तीसगढी तेलंगी , गोंडी व मरावडी भाषिकांचे वास्तव्य आहे. आम्ही याला आमची समृद्धी समजतो, न्यूनता नव्हे.  विदर्भ राज्याची मागणी ही भाषावादावर आधारित नाही. आमच्या मागणीचा संबंध विकासाशी आहे. १९६० ते २०१४ पर्यत राज्याचा एकही मराठी भाषिक मुख्यमंत्री विदर्भाचा विकास करु शकला नाही म्हणून विदर्भ राज्य हवे असेही अणे म्हणाले.  – अ‍ॅड. श्रीहरी अणे, ज्येष्ठ विदर्भवादी

 

जनमताची तरतूद नाही

पवार याचे विधान या भागातील जनतेची दिशाभूल करणारे आहे. विदर्भात यापूर्वी जनमत घेण्यात आले  आणि त्याला ८० ते ९० टक्के पाठिंबा मिळाला आहे. मुळात संविधानात स्वतंत्र राज्याच्या निर्मितीसाठी जनमत घेण्याची तरतूद नाही. मात्र, शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्याला त्याची माहिती नाही याचे आश्चर्य वाटते. ९० टक्के जनतेची मागणी विदर्भ व्हावा, अशी आहे.    – राम  नेवले, विदर्भ राज्य आंदोलन समिती

 

मराठी-अमराठी वाद अकारण

विदर्भात आजपर्यंत कधीच नव्हता असा मराठी आणि अमराठी भाषिकाचा वाद शरद पवार यांनी विधान करून समोर आणला आहे. ते पुण्यात गेले की एक भाषा आणि विदर्भात आले विदर्भाचा गुणगौरव करतात. त्यांची ही दुटप्पी भूमिका जनतेला माहीत आहे. त्यामुळे विदर्भाची जनता त्यांच्या पक्षाला निवडणुकीत त्यांना योग्य जागा दाखवेल.      – अ‍ॅड. मुकेश समर्थ, व्ही कॅन

 

तेलंगणासाठी जनमत घेतले का?

शरद पवार यांनी अभ्यास न करता विधान केलेले आहे. मुळात संविधानामध्ये कलम ३ नुसार छोटय़ा राज्याच्या निर्मितीसाठी जनमत घेता येत नाही. ते स्वत: केंद्रात मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली  होती. त्यावेळी का नाही घेतले जनमत. विदर्भाची मागणी ही हिंदी भाषिकांची नाही मराठी भाषिक या विदर्भाच्या आंदोलनात सुरुवातीपासून आहेत. शिवाय विदर्भाचा निर्णय हा विदर्भातील जनता घेण्यासाठी सक्षम आहे, त्यासाठी शरद पवार यांनी सांगण्याची गरज नाही. खरे तर राज ठाकरे यांनी विचारलेला प्रश्न आणि त्याला शरद पवार यांनी दिलेल्या उत्तरामध्ये विसंगती आहे.      – श्रीनिवास खांदेवाले, विदर्भवादी नेते