१२ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा

केंद्र आणि राज्य शासन गेल्या तीन वर्षांत सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापाऱ्यांसह इतरही घटक सरकारवर असमाधानी आहेत. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून विधानभवनावर १२ डिसेंबरला जनआक्रोश हल्लाबोल आंदोलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती शनिवारच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख आणि विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी संयुक्तरित्या दिली.

अनिल देशमुख म्हणाले की, केंद्र व राज्यातील सध्याचे सत्ताधारी व तेव्हाचे विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करणार, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर ५० टक्के जोडून शेतमालाला भाव, वर्षांला दोन कोटी रोजगारसह इतरही अनेक स्वप्न दाखवत सत्ता मिळवली. परंतु सत्ता मिळून तीन वर्षे लोटल्यावरही एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. शासनाने सहा महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याची घोषणा केली. परंतु लाभ पोहचू नये म्हणून ऑनलाईन- ऑफलाईन अर्जाची अट घालत कुणालाही पैसे मिळू दिले नाही. कर्जमाफीचा लाभ मिळाला नसतानाच शेतपिकावर बोंडअळीसह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आहे. दरम्यान, नोटबंदी, जीएसटीमुळे उद्योग अडचणीत सापडल्याने अनेकांचे रोजगार हिरावले आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी, उद्योगपती, नोकरदार, दलित, अल्पसंख्याक, महिला तरुण सरकारवर असमाधानी आहे.

या सर्वाच्या संतापाला वाचा फोडण्यासाठी १२ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते धनवटे नॅशनल कॉजेलच्या मैदानात एकत्र येऊन रहाटे कॉलनी, वर्धा रोड होत लोकमत चौकात येतील. तर काँग्रेसचे कार्यकर्ते दीक्षाभूमी चौकात एकत्र येऊन लोकमत चौकात येतील. लोकमत चौकात दोन्ही पक्षासह इतर विरोधीपक्षाचे नेते व कार्यकर्ते विधानभवनाच्या दिशेने कुच करतील. या आंदोलनातून झोपलेल्या शासनाला जागे करण्याचे काम करण्यात येणार आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, कर्जमाफीचा लाभ मिळाला नसतानाच विदर्भातील शेतकरी उभ्या पिकावर बोंडअळीसह इतर किडीमुळे पीक नष्ट झाल्याने जास्तच अडचणीत आहे. या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सत्ताधारी शासकीय जाहिरातीवर नियमबाह्य़ १२ हजार कोटी रुपये खर्च करत आहे. राज्यात एससी, एसटीसह मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गेल्या दीड वर्षांपासून शिष्यवृत्ती नाही.

मोठय़ा संस्थेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांंच्या सवलती बंद करण्यात आल्या आहे. त्यातच मागासवर्गीयांचा निधी सत्ताधाऱ्यांनी इतर कामात वळवला आहे. ग्रामीण भागातील रस्तांची अवस्था दयनीय आहे.

राज्यातील सर्व शेतकरी, कष्टकरी व इतरांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत जनआक्रोश हल्लाबोल आंदोलन आयोजित केले आहे. आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद करणार आहे. राहुल गांधी हेही आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता असून आंदोलनात शेकाप, समाजवादी पार्टी, रिपाइं (कवाडे) आणि इतरही काही विरोधी पक्षाचा सहभाग असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.