शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्यात आलेल्या ‘लर्न फ्रॉम होम’ उपक्रमाबाबत ग्रामीण भागातील पालकांकडून संताप व्यक्त होत असून ‘ऑनलाईन ‘लेसन’ नको तर पोटासाठी रेशन द्या’अशी मागणी ग्रामीण भागातील पालकांकडून केली जात आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जीवनमान विस्कळीत झाले आहे. लोकांचा रोजगार बंद असून उदरनिर्वाहासाठी धडपड सुरू आहे. एकूणच लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ग्रामीण भागातील जीवनाचे असे विदारक चित्र असताना दुसरीकडे मात्र, शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी ‘लर्न फ्रॉम होम’ उपक्रमाचा अट्टाहास सुरू आहे. विद्यार्थ्यांचे व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार करून त्यामाध्यमातून अभ्यास देणे, त्यावर आधारित प्रश्नपत्रिका सोडवून घेणे इत्यादी बाबी करून घेतल्या जात आहे. हे सर्व कमी की काय म्हणून रेडिओवरचे कार्यक्रम ऐकण्याबाबतही विद्यार्थ्यांना सक्ती केली जात आहे. सुरुवातीला या उपक्रमाबाबत आढावा घेतला जात नव्हता परंतु, आता त्याबाबतचा आढावा घेणे सुरू झाल्याने शिक्षकही पालकांना वारंवार फोन करून विद्यार्थ्यांबाबत माहिती जाणून घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण पालक अधिकच त्रस्त होत असून गुरुजी, आम्हाला जगू द्या, सध्या आमच्यासाठी तेच महत्त्वाचे आहे. आज जगलो तर उद्या शिकता येईल. आमच्या लेकरांचा एवढाच कळवळा असेल तर या तुमच्या ऑनलाईन लेसन ऐवजी त्याच्यासाठी थोडे रेशन पाठवायला तुमच्या सरकारला सांगा, असा संताप व्यक्त केला जात आहे.  काही ठिकाणी यावरून शिक्षक व पालकात वाक्युद्ध रंगल्याचेही उदाहरण पहायला मिळत आहेत. हे थांबले नाही तर या उपक्रमावरून शिक्षक व पालकात संघर्ष निर्माण होण्याची संभावना नाकारता येत नाही.