News Flash

मांसविक्रीच्या अर्थकारणातून वराह मोहिमेस विरोध

सोमवारपासून शहरात वराह पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यासाठी तामिळनाडूतून पथक बोलावण्यात आले आहे.

मांसविक्रीच्या अर्थकारणातून वराह मोहिमेस विरोध
(संग्रहित छायाचित्र)

व्यवसायात कोटय़वधींची उलाढाल; सुरक्षा घेऱ्यात आजपासून पुन्हा मोहीम

वराह विक्रीत होणारी कोटय़वधी रुपयांची उलाढाल हेच मोकाट वराह पकडण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या मोहिमेला विरोध होण्याचे प्रमुख कारण असल्याचे मंगळवारी तामिळनाडूच्या पथकावर झालेल्या हल्ल्याने स्पष्ट झाले आहे.

सोमवारपासून शहरात वराह पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यासाठी तामिळनाडूतून पथक बोलावण्यात आले आहे. मंगळवारी या पथकावर वराहपालन करणाऱ्यांनी जरीपटका भागातील बँक कॉलनी परिसरात हल्ला केला. त्यात पथकातील सहा जण जखमी झाले. त्यामुळे बुधवारी ही मोहीम थांबवण्यात आली. गुरुवारपासून ती पुन्हा राबवण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

शहरात वराहाच्या मांसाला मोठी मागणी असल्याने व इतर राज्यातही ते पाठवले जात असल्याने नागपुरात १५० ते २०० कुटुंब वराहपालन करतात. महापालिकेच्या मोहिमेमुळे त्यांच्या व्यवसायावरच गंडांतर आल्याने त्यांनी विरोध सुरू केला आहे. वराहपालनावर अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. महापालिकेमुळे त्यावरच गदा आल्याचे, राजेश तांबे यांनी सांगितले.

मोहिमेविरोधात निदर्शने

वराह पकडण्याविरोधात बुधवारी  संविधान चौकात आणि त्यानंतर महापालिकेत निदर्शने करण्यात आली.तामिळनाडूच्या  पथकाला परत पाठवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा संघटनेचे पदाधिकारी राजू तांबे यांनी दिला. तामिळनाडूच्या पथकातील लोक वराह पकडून ते आपल्या राज्यात नेऊन विकतात, असा आरोप त्यांनी केला. यावेळी दीपक गुजर, राकेश समुद्रे, रामदास गवतेला आदी उपस्थित होते.

पथकाच्या मदतीला माजी सैनिक

हल्ल्याच्या घटनेनंतर आता पथकाच्या संरक्षणासाठी पोलिसांसोबत महापालिकेच्या माजी सैनिकांचे ४० लोकांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. शहर स्वच्छतेवर देखरेख ठेवण्यासाठी माजी सैनिकांचे पथक महापालिकेने स्थापन केले होते. यात काही माजी पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

असे आहे अर्थकारण

वराह विक्रीचा व्यवसाय करणारे अजय राणे यांनी सांगितले, शहरात एका व्यक्तीकडे २० ते २५ तर कोणाकडे १०० ते १५० वराह आहेत. ५०० रुपयापासून १० हजार रुपये याप्रमाणे नागपुरात त्यांची विक्री केली जाते. छत्तीसगड, मध्यप्रदेश, बिहार, ओरिसा, आंध्रप्रदेश या भागातील लोक नागपुरात येऊन खरेदी करतात. वराहाचे मांस नागपुरात १६० रुपये किलो तर इतर  राज्यात २०० ते ४०० रुपये किलो आहे. विशेषत: पांढऱ्या वराहाचे मांस महाग आहे. नागपुरात काळ्या वराहांची संख्या जास्त आहे. एका वराहाच्या मागे किलोच्या भावाप्रमाणे पैसा मिळत असतो. जो जितका जास्त वजनदार तेवढी अधिक किंमत. शिवाय या वराहांच्या केसापासून विविध प्रकारचे पेंटिंग ब्रश, हाडापासून बटन्स तर शेतीच्या कामातही त्यांचा उपयोग होतो. शहरात १०० ते १२५ लोक हा व्यवसाय करतात.

नागरिकांच्या तक्रारीवरूनच मोहीम

मोकाट वराहांमुळे त्रस्त आशीनगर व सतरंजीपुरा झोनमधील नागरिकांच्या तक्रारीवरून  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वराह पकडण्याची मोहीम राबवण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. महापालिकेने यासाठी निविदा काढल्या, परंतु स्थानिक  एकही संस्था या कामासाठी पुढे आली नाही. तामिळनाडूतील डी राजा यांचे पथक हे काम करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेने त्यांना बोलावले आणि प्रायोगिक तत्त्वावर त्यांना काम दिले.

‘‘आतापर्यंत ७० वराह पकडण्यात आले. पथकावर हल्ला झाल्याने त्यापैकी २० सोडण्यात आले. मोहीम गुरुवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. कारवाईसाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. शिवाय महापालिकेच्या ४०माजी सैनिकांचे पथक सुरक्षेसाठी राहणार आहे.

– डॉ. गजेंद्र महल्ले, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2019 12:47 am

Web Title: opposition to the pig campaign from the economics of meat sales abn 97
Next Stories
1 लोकजागर : पुराच्या प्रदेशात ‘पाणीबाणी’!
2 कुशल कामगारांच्या रोजगार निर्मितीचा प्रश्न बिकट
3 विदर्भ भूदानयज्ञ मंडळावरील नियुक्त्या बेकायदेशीर
Just Now!
X