घरासमोर खेळताना हातातील संत्री पडून कलंडून रस्त्यावर पडले. ते उचलण्यासाठी गेली असता भरधाव कारने अडीच वर्षांच्या चिमुकलीला चिरडल्याची हृदयद्रावक घटना नंदनवन पोलीस हद्दीतील श्रीकृष्णनगर परिसरात बुधवारी दुपारी घडली.

निधी ब्रिजभूषण पटेल रा. श्रीकृष्णनगर असे मृत चिमुकलीचे नाव आहे. तिचे वडील कारचालक व आई गृहिणी आहे. ब्रिजभूषण यांना चार मुली असून निधी सर्वात लहान होती. बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास आई घरात असताना मुलगी घरासमोर अंगणात खेळत होती. यावेळी आईने तिला संत्री खाण्यासाठी दिली. तिच्या हातातील संत्री जमिनीवर पडली व कलंडून रस्त्यावर गेली. ती संत्री उचलण्यासाठी रस्त्यावर गेली असता अचानक भरधाव आलेल्या एका अज्ञात कारने तिला चिरडले. त्यानंतर आरोपी कारचालक पळून गेला. निधी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला एका कारने चिरडल्याने शेजारच्या महिलेने बघितले. तिने आरडाओरड केली. तेव्हा निधीची आई घराबाहेर आली. निधीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. पण, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक स्नेहा जायभाये आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. निधीची आई सविता ब्रिजभूषण पटेल (३५)  यांच्या तक्रारीवरून अज्ञात कारचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घराजवळ आंधळे वळण

सविता यांचे घर दोन रस्त्यांच्या कोपऱ्यावर आहे. त्यामुळे एका रस्त्याने येणाऱ्या वाहनचालकांना दुसऱ्या रस्त्यांवरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यांच्या घराजवळ आंधळे वळण आहे. पण, वस्तीतून वाहन चालवताना कारचालकांनी आपल्या गतीवर नियंत्रण ठेवायला हवे होते. कारचालकाचा वेग जास्त होता. त्यामुळेच हा अपघात घडला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कारचालकाचा शोध घेण्यात येत आहे.