शेतकरी संकटग्रस्त, एक लाख ३३ हजार हेक्टरवरील पिकोंची नासाडी

यंदा सप्टेंबपर्यंत झालेल्या समाधानकारक पावसाने चांगल्या उत्पादनाची आशा शेतकऱ्यांना असताना विदर्भात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटात लोटले आहे.

पश्चिम विदर्भातील कापूस, सोयाबीन उत्पादक भागांत ऐन वेचणी-काढणीच्या वेळी आलेल्या अतिवृष्टीने ४० टक्के नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज असला, तरी नुकसान त्याहून अधिक आहे. पूर्व विदर्भातील धान मातीमोल झाले असून या भागात सरासरी एक लाख ३३ हजार हेक्टरवरील पिकोंची नासाडी झाली आहे. संत्र्याच्या बागांना फटका बसला आहे. एकूणच अवेळी पावसाने कापूस, संत्रा, धान, सोयाबीन या प्रमुख पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून, त्याचा शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे.

नागपूर जिल्ह्य़ात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. मौदा, रामटेक आणि पारशिवनी या तीन तालुक्यांत धान पिकांची नासाडी झाली. रामटेक तालुक्यात याचे प्रमाण अधिक आहे. प्रशासनामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. शेतात काढणीला आलेले आणि कापणी झालेले सोयाबीन सडून गेले आहे. अनेक भागांत सोयाबीनला कोंब फुटले आहेत. ज्वारी शेतातच काळी पडली. वेचणीला आलेला कापूस भिजला. कपाशीची बोंडे सडू लागली.

पश्चिम विदर्भात सुमारे १२ लाख १८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हा केवळ प्राथमिक अंदाज आहे. पीक नुकसानीच्या अंतिम अहवालातून पीक हानीचे क्षेत्र वाढू शकते.

यंदा पेरणीला सुरुवातच उशिरा झाली. पावसाने मोठा खंड दिल्याने मूग, उडीद या अल्पावधीतील पिकांचा पेरा कमी झाला. अनेक भागांत तर सोयाबीनलादेखील मोड आले. कापूस वेचणीचा आणि सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू होताक्षणी १८ ऑक्टोबरपासून अवकाळी पावसाने अक्षरश: हैदोस घातला. बुलढाणा जिल्ह्य़ात तर अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीनच्या गंज्या वाहून जात असल्याचे विदारक चित्र दिसले.

पूर्व विदर्भात सर्वाधिक ७ लाख ६३ हजार हेक्टरवर भात शेती केली जात आहे. दिवाळीच्या पूर्वी धानाच्या कापणीला सुरुवात होते. परंतु यंदा पावसाने थमान घातल्याने एक लाख हेक्टरवरील पीक वाया गेले. खरीप हंगामात या पिकावरच भर असतो. पाऊस लांबल्याने हलक्या धानाचे नुकसान झाले. परतीच्या पावसाने कापणी झालेले धान मातीमोल झाले. कापणी झालेल्या धानाच्या कळपा पाण्यात गेल्या. वर्धा जिल्ह्य़ात ७५१ हेक्टर, नागपूर जिल्ह्य़ात ११०२० हेक्टर, भंडारा जिल्ह्य़ात ८१४९ हेक्टर, गोंदिया जिल्ह्य़ात २१,९८४ हेक्टर आणि गडचिरोली जिल्ह्य़ात १३, ४३३ हेक्टरचा समावेश आहे. यात भात पिकांचे ७५२४६.७१ हेक्टर, कापूस ३९,६३९ हेक्टर, सोयाबीन १८,६९० हेक्टर आणि इतर पिकांचे ३३० हेक्टरचे नुकसान झाले आहे.

संत्री-मोसंबी बागांनाही फटका

परतीच्या पावसाचा फटका विदर्भातील संत्री आणि मोसंबीच्या बागांनाही बसला आहे. प्रतिकूल वातावरणामुळे आंबिया आणि मृग या दोन्ही बहाराची संत्री आणि मोसंबीची फळगळ सुरू झाली आहे. मात्र अजूनही त्याची दखल कृषी विभागाने घेतलेली नाही. संत्री बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो, आता उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कर्जाच्या फेऱ्यात अडकण्याची भीती त्यांना आहे.

विम्याचा लाभ कसा मिळणार?

विदर्भात १० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिकांचा विमा काढला असला, तरी नुकसानभरपाईसंदर्भात टाळाटाळ केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. नुकसान झाल्यानंतर ७२ तासांमध्ये संबंधित विमा कंपनीला कळविणे शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. सूचना दिल्यानंतरच कंपनीच्या प्रतिनिधीकडून सर्वेक्षण आणि पंचनाम्याची प्रक्रिया होते, पण कंपनीकडून प्रतिसादच मिळाला नसल्याची तक्रार आहे.

विदर्भात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या पाश्र्वभूमीवर दोन गोष्टी तातडीने करणे आवश्यक आहे. पंचनामे त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे आणि रब्बी हंगामासाठी साहाय्य करणे ही कामे प्राधान्यक्रमात आहेत. ७५ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून अंतिम अहवाल आल्यानंतर मदतीचे वाटप होईल. पीक विम्याच्या व्यतिरिक्त देखील शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे.

   – डॉ. अनिल बोंडे, कृषिमंत्री