चंद्रशेखर बोबडे

उत्पादकांनी कष्टाने पिकवलेल्या संत्री, मोसंबीला यंदा नोटबंदीच्या वर्षांपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. नोटबंदीच्या काळानंतर प्रथमच अवघ्या सहा ते १४ रुपये किलो इतका कमी दर मिळत आहे.

विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात संत्री, मोसंबीचे उत्पादन घेतले जाते. येथील संत्री नागपुरी संत्री म्हणून ओळखली जातात. ती देश-विदेशांतून मागविली जातात. नागपूरमध्ये कळमना बाजार समिती ही आशियातील सर्वात मोठी बाजार समिती मानली जाते. येथून संत्री वेगवेगळ्या राज्यांत पाठवली जातात. त्यानंतर वरूड, परतवाडा, काटोल आणि नरखेड या भागातही संत्र्यांच्या बाजारपेठा आहेत. नागपुरी संत्री  सध्या ६ रुपये ते १४  रुपये प्रतिकिलो या दराने  शेतकऱ्यांकडून घेतली जात आहेत. अतिशय उच्च दर्जा असेल तर १५ रुपये प्रतिकिलो दर दिला जात आहे. संत्र्याची प्रतवारी (ग्रेडिंग) करून  विकल्यास १७ रुपये प्रतिकिलो  दर दिला जातो, असे संत्री व्यापारी राजेशभाई आटोणे यांनी सांगितले. गेल्या वर्षी २० ते ३० रुपये प्रतिकिलो दर होते. नोटबंदीनंतर प्रथमच इतके दर घसरल्याचे राजेशभाई यांनी स्पष्ट केले.

मोसंबीचीही स्थिती अशीच आहे. सुरुवातीला १२  ते ५० रुपये प्रतिकिलो दर होते. मोसंबीची खरेदी प्रामुख्याने त्याचा रस काढणाऱ्या कंपन्यांकडून होते. टाळेबंदीच्या काळात सर्व कंपन्या बंद असल्याचा फटका या फळाला बसला. या काळात पाच रुपये किलोप्रमाणे उत्पादकांनी मोसंबी विकली. संत्र्यांवर कीड पडल्याने व बाजारपेठ कोसळण्याच्या भीतीने उत्पादकांनी त्यांचा माल एकाच वेळी बाजारपेठेत आणला. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने किमती पडल्या, असे विक्रेत्यांनी सांगितले.

काटोल तालुक्यातील प्रगतशील शेतकरी अमिताभ पावडे म्हणाले, संत्री, मोसंबी ८ रुपये किलोप्रमाणे विकावी लागत आहेत. मार्च महिन्यात दर ३० रुपये होता. छोटय़ा छोटय़ा गावात तर उत्पादकांची निकड बघून व्यापारी आणखी दर कमी करतात. नरखेड, काटोल भागात चार रुपये प्रतिकिलोप्रमाणेही संत्री खरेदी करण्यात आली.

‘‘संत्री उत्पादकांच्या पट्टय़ात प्रक्रिया केंद्र नाही, शीतगृहे व्यापाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. अशावेळी व्यापारी देईल तो दर घेण्यापलीकडे उत्पादकांकडे पर्याय नाही.’’

– अमिताभ पावडे, संत्री उत्पादक, नागपूर.

ग्रेडिंग आणि कोटिंगमु़ळे संत्र्यांचा चांगला भाव मिळतो. दुर्दैवाने नागपूर, कळमेश्वर या संत्रा पट्टय़ात ग्रेडिंग-कोटिंगचे प्रकल्प नाहीत. त्यामुळे या भागातील संत्र्याला चांगली किंमत मिळत नाही. नागपूरच्या तुलनेत वरूड-मोर्शी भागात मोठय़ा प्रमाणात हे प्रकल्प असल्याने तेथे चांगली किंमत शेतकऱ्यांना मिळते.

-श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज.

स्थिती काय? सध्या नागपूरच्या कळमना बाजारात संत्र्याचे दर प्रतिकिलो ६ रु. ते १४ रुपये असून ते नोटबंदीच्या वर्षांत (२०१६) ते ५ रुपये ते ८ रुपये किलो होते. नवी मुंबईतील घाऊक बाजारात नागपूरची संत्री प्रतिडझन ७० ते १०० रुपये या दरांनी मिळत आहे. किरकोळ बाजारात त्यांचा दर अधिक आहे.

संकट मालिका.. यंदा संत्री, मोसंबीच्या पिकाला सुरुवातीला टाळेबंदीचा, त्यानंतर अतिवृष्टीचा व नंतर पडलेल्या किडीचा फटका बसला. जे काही उत्पादन झाले त्याला आता बाजारभावाचा फटका बसत आहे