|| महेश बोकडे

नागपूर : ‘कोव्हॅक्सिन’चा साठा काही दिवसांपूर्वी अनेक केंद्रात संपल्याने लसीकरण थांबले होते. परंतु केंद्राकडून पुन्हा या लसींचा पुरवठा सुरू झाल्यावर ६ एप्रिलला राज्याच्या आरोग्य विभागाने राज्याच्या सर्व भागात लसींचे वितरण केले. परंतु त्याचा वापर दुसऱ्या मात्रेसाठी येणाऱ्यांसाठीच करण्याचा वादग्रस्त आदेश काढण्यात आला. परंतु दुसऱ्याच दिवशी त्यात सुधारणा करत ही लस सर्वांना दिली जात असल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे.

राज्यात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशिल्ड या दोन करोना प्रतिबंधक लसी नागरिकांना दिल्या जात आहेत. मध्यंतरी नागपूरसह राज्यातील काही जिल्ह्यांत कोव्हॅक्सिनचा साठा संपल्याने लसीकरण थांबले होते. तर काही ठिकाणी कोविशिल्डच्याही साठ्याची स्थिती वाईट होती. दरम्यान, राज्य शासनाने केंद्राकडून आवश्यकतेनुसार लस मिळत नसल्याचा आरोप केला होता. त्याला केंद्राच्या मंत्र्यांनीही राज्यांच्या करोना हाताळणीबाबतच्या विविध चुकीवर बोट ठेवले होते. या वादानंतर केंद्राकडून आता लसींचा पुरवठा सुरू झाला आहे.

दरम्यान, केंद्राने लस उपलब्ध केल्यावर ६ एप्रिलला राज्याच्या आरोग्य विभागाने राज्याच्या सर्व विभागांतील आरोग्य कार्यालयांना ३ लाख ४१ हजार ४४० लसींच्या मात्रेचा पुरवठा केला.

परंतु हा वितरित साठा केवळ दुसरी मात्रा घेणाऱ्यांसाठीच वापरण्याचा वादग्रस्त आदेश काढला. त्यामुळे एक ते दोन दिवस काही ठिकाणी पहिली मात्रा घेण्यासाठी आलेले बरेच व्यक्ती लस न घेता परतले. ही चूक कळल्यावरह दुसऱ्याच दिवशी ही मात्रा सर्वांनाच देण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केली. दरम्यान, राज्य शासनाकडून केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी हा प्रकार झाला काय? अशी चर्चाही वैद्यकीय क्षेत्रात रंगली आहे.

विभागाला मिळालेल्या लसींची मात्रा

आरोग्य उपसंचालक कार्यालयात अकोला विभागासाठी कोव्हॅक्सिनचा १६,१६० मात्रा, औरंगाबाद विभागाला ३४,७२०, लातूर विभागाला ३०,७२०, ठाणे विभागाला ४३,०४०, पूणे विभागाला ७७,९२०, नाशिक विभागाला ३३,२८०, नागपूर विभागाला ५५,३६०, मुंबई शहर व उपनगराला ३७,१२० लसींच्या मात्रेचा पुरवठा झाला.

कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा मोठ्या प्रमाणात नागरिकांना देण्यात आली असून त्यांच्या दुसऱ्या मात्रेत व्यत्यय येऊ नये म्हणून हा आदेश काढण्यात आला होता. परंतु कुणाची अडचण होऊ नये म्हणून लगेच त्यात सुधारणा करत ही लस आता पहिली व दुसरी मात्रा घेणाऱ्या दोघांनाही दिली जात आहे. – डॉ. अर्चना पाटील, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग.