वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची खंत

राज्याने ठरवलेल्या ५० कोटी वृक्षलागवड योजनेत राज्याच्या इतर खात्याच्या तुलनेत वनखात्याची कामगिरी सरस ठरल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. इतर खाते उदासीन असल्याची नाराजी व्यक्त करतानाच यावर्षी त्या कामगिरीत सुधारणा होईल, असा विश्वास देखील त्यांनी दर्शवला. ३३ कोटी वृक्षलागवडीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

३३ कोटी वृक्षलागवडीअंतर्गत नागपूर विभागाला यंदा पाच कोटी ९४ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी खड्डे देखील तयार असून रोपवाटिकांमध्ये रोपे तयार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्याठिकाणी पाच टक्क्यांपेक्षा अधिक वन आहे, त्याठिकाणी टँकरची गरज भासते आहे. मीयावाकीच्या धर्तीवर कमी जागेत घनदाट जंगल तयार करण्यासाठी संपूर्ण राज्यात १०० अटल आनंदवन तयार करणार आहे. भारतीय वन सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील वनक्षेत्र वाढल्याने महाराष्ट्राला प्रथम क्रमांक दिला आहे.

वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी वन कन्या समृद्धीसह अनेक योजना आणल्याचेही त्यांनी सांगितले. यावर्षी ३३ कोटी वृक्षारोपणाचा शुभारंभ आनंदवन येथे वृक्ष लागवड करून करण्यात येणार आहे.

३३ कोटीशिवाय चार कोटी बांबू लागवडीचे उद्दिष्टही ठेवले आहे. वृक्षसंवर्धनासाठी जिल्हा नियोजनातून खर्च करण्याची परवानगी देण्यात आली असून, लोकप्रतिनिधींनाही त्यांच्या विकास निधीतून ट्री गार्ड, कुंपण आदी कामांसाठी निधी देता येणार आहे. जैवविविधता संवर्धनासाठी स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्याने प्रत्येक जिल्ह्यत निर्माण करण्यात येणार आहेत.

असे आहे नियोजन

नागपूर जिल्ह्यत तीन कोटी ९४ लाख ५५ हजार , नागपूर जिल्ह्यत ९८ लाख ३९ हजार , वर्धा जिल्ह्यत ८७ लाख ५१ हजार , भंडारामध्ये ५४ लाख, गोंदिया ७८ लाख ८९ हजार, चंद्रपूरमध्ये एक कोटी ६७ लाख १६ हजार, गडचिरोलीत एक कोटी आठ लाख ६० हजार इतके वृक्षारोपणाचे उद्दिष्ट आहे. विभागात पाच कोटी ३० लाख ६० हजार रोपे उपलब्ध आहेत. विभागात सद्यस्थितीत चार कोटी तीन लाख ६५ हजार खड्डे पूर्ण झाले आहेत.

‘वाघां’ची संख्या लोकसभेतही वाढली

राज्यातील वाघांची संख्या वाढली आहे. २०१४ मध्ये २०४ वाघ होते. ही संख्या आता २४५-२५०च्या दरम्यान पोहोचली आहे. फक्त जंगलातच नव्हे तर  लोकसभेतही ‘वाघां’ची संख्या देखील वाढली असून पुढच्या काळात ती विधानसभेतही वाढलेली असेल. वाघाच्या वाढत्या संख्येबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुनगंटीवारांनी वरील राजकीय उत्तर दिले.

काँग्रेसला पक्ष प्रवेशाची पुस्तिका बदलावी लागेल

काँग्रेसचे चंद्रपूरचे नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांच्या दारूबंदी उठवण्याच्या मागणीमुळे  काँग्रेसला त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या अटी बदलाव्या लागतील, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. बाळू धानोरकर यांनी अलीकडेच चंद्रपूर जिल्ह्य़ातून दारूबंदी हटवावी, अशी मागणी  केली होती. या संदर्भात मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, काँग्रेसमध्ये प्रवेश घेताना रितसर सदस्यत्व शुल्क द्यावे लागते.  त्या पावतीवरच  ‘मी दारू पिणार नाही’ असा उल्लेख असतो. मात्र, धानोरकर यांनी दारूबंदी उठवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे  काँग्रेसला त्यांची पक्ष प्रवेशाची पुस्तिका फेकावी लागेल किंवा त्यांच्या नियमात बदल करून नवी पावती पुस्तिका तयार करावी लागेल. काँग्रेस हा कालबाह्य़ झालेला पक्ष आहे. मात्र अजूनही काही चांगले नेते या पक्षात आहेत. आता ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.