‘ओटीपी’मुळे शेकडो परीक्षार्थीचा मन:स्ताप; ढिसाळ नियोजनामुळे प्रशासनाविरोधात रोष

नागपूर : पुढील दोन वर्षांनी शतकोत्तर वर्षांत पदार्पण करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनाचा ऑनलाईन परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षार्थीना मोठा फटका बसला. परीक्षेची वेळ सुरू होऊनही विद्यार्थ्यांना वेळेत ‘ओटीपी’च मिळाला नाही. अनेकांना पेपर सोडवूनही तो जमाच करता आला नाही. या सगळ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना  प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी चार टप्प्यात परीक्षार्थीची मोजकीच संख्या असताना विद्यापीठाची यंत्रणा सुरळीत परीक्षा घेऊ शकली नाही.

सकाळी साडेनऊ वाजता विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा सुरू होताच पहिल्या टप्प्यात पंधरा विद्यार्थ्यांना ‘ओटीपी’बाबत समस्या जाणवू लागली. यातील काही विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा ‘ओटीपी’ देऊन पेपर देता आला. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत बहुसंख्य विद्यार्थ्यांना या समस्येला सामोरे जावे लागले. बीएस्सीच्या काही विद्यार्थ्यांना सुमारे अर्धा तास पेपर सुरू करण्यात विलंब झाला.

दुसऱ्या टप्प्यातील अध्र्याहून अधिक विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षाच देता आली नाही. अनेकांनी पेपर सोडवला असला तरी तो संकेतस्थळावर जमाच झाला नाही. परीक्षा विभागाच्या मदत केंद्रावर संपर्क साधला असता काही विद्यार्थ्यांना ‘ओटीपी’ देऊन उशिरा पेपर देण्याची मुभा देण्यात आली. मात्र, विद्यापीठाच्या या सर्व गोंधळामुळे परीक्षार्थींना प्रचंड मनस्ताप झाला असून विद्यापीठाकडे तक्रारींचा पाऊस आहे. यातील काही विद्यार्थ्यांनी थेट परीक्षा विभाग गाठत आपले गाऱ्हाणे मांडले.

‘ओटीपी’हा प्रकारच बंद केला

ऑनलाईन परीक्षेची महिनाभरापासून युद्धपातळीवर तयारी सुरू असून सर्व गोष्टींची पडताळणी करण्यात आल्याचा दावा करणाऱ्या नागपूर विद्यापीठाला साधा ‘ओटीपी’ही नियोजित वेळेत पाठवता आला नाही. त्यामुळे विद्यापीठाने अ‍ॅप तयार करून कशी पडताळणी केली हा आता संशोधनाचा विषय ठरला आहे. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी डोकेदुखी ठरलेला ‘ओटीपी’ पाठवणेच आता विद्यापीठाने बंद केले आहे. त्यामुळे लॉगिन आयडी आणि पासवर्डने विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.

पुन्हा परीक्षेची शक्यता

दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ऑनलाईन परीक्षेत प्रचंड गोंधळ उडाल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठाद्वारे ऑफलाईन पद्धतीने अशा विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होण्याची शक्यता विद्यापीठाने वर्तवली आहे.

विद्यार्थ्यांना रडू कोसळले

परीक्षा भवनमध्ये विद्यार्थ्यांच्या तक्रारीचा पाऊस पडला. बीएस्सीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीने केवळ १७ प्रश्न सोडवले व तिला काही कळायच्या आतच अ‍ॅप आपोआप बंद झाले. त्यामुळे आपल्या परीक्षेचे आता काय होणार, असा प्रश्न तिच्यापुढे होता. एका नामवंत संस्थेमध्ये एम.एस्सी.च्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी तिला गुणपत्रिका महत्त्वाची आहे. मात्र, गुरुवारच्या ऑनलाईन परीक्षेत असा गोंधळ झाल्याने आता तिची दुसऱ्यांदा परीक्षा कधी होणार, हा प्रश्न असून निकाल वेळेत न मिळाल्यास प्रवेशपूर्व परीक्षेला मुकावे लागण्याची भीतीने विद्यार्थिनी रडू कोसळले.

एकच प्रश्न चारदा

तिसऱ्या टप्प्यात झालेल्या एका परीक्षेमध्ये एक प्रश्न चारदा विचारण्यात आला होता. गंमत म्हणजे, प्रश्न क्रमांक ३३,३४,३५ आणि ३६ असा सलग  एकच प्रश्न देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनावर हसावे की रडावे, हेच कळत नव्हते.