ऐतिहासिक विक्रम; परीक्षा पद्धतीमधील उणिवांचा परिणाम

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेच्या निकालाने विक्रमच केला आहे. नुकताच विद्यापीठाच्या एम.ए. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये काही विद्यार्थ्यांना चारही विषयांत १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. परीक्षा पद्धतीतील उणिवांमुळे एम.ए. सारख्या लेखी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळण्याचा ऐतिहासिक विक्रम नागपूर विद्यापीठाने रचल्याने परीक्षेच्या गुणवत्तेवर शिक्षण तज्ज्ञांकडून टीका होत आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार, सत्रांत परीक्षांचा निकालाचा ‘सीजीपीए’ दिला जातो. त्यामुळे पैकीच्या पैकी गुण घेणाऱ्यांचा ‘सीजीपीए’ यंदा १० आहे. विशेष म्हणजे, ज्या विद्याथ्र्याने एम.ए. परीक्षेत १० ‘सीजीपीए’ मिळवला त्याच्या आधीच्या निकलाची पडताळणी केली असता पहिल्या सत्रात ५.७५, दुसऱ्या सत्रात ५.७५, तिसऱ्या सत्रात ६.५० एवढा होता. मात्र, विद्यापीठाच्या यंदाच्या ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांनी चारही विषयांत १०० गुण मिळवल्याने त्याचा ‘सीजीपीए’ १० झाला आहे. विद्यार्थ्यांचा निकाल बघून शिक्षकांनाही  धक्का बसला आहे. मानव्यशास्त्राच्या एका वरिष्ठ शिक्षकाने सांगितले की, एखाद्या विद्याथ्र्याने एम.एम.मध्ये ४०० पैकी ४०० गुण मिळवल्याचे आयुष्यात प्रथमच पाहिले आहे. कदाचित भारतातच हे पहिल्यांचा झाले असावे. आतापर्यंत एम.ए. परीक्षा सिद्धांतावर आधारित होत्या.

ज्यामध्ये विद्यार्थ्यांना लांब उत्तरे लिहावी लागत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कितीही अचूक उत्तरे लिहिली तरी त्याला १०० पैकी १०० गुण कधीच दिले गेले नाहीत. परंतु, नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेमुळे हा चमत्कार घडला  आहे.

अंतर्गत गुणांचीही मुक्तहस्ते उधळण

विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीनुसार अंतर्गत ५० गुण हे महाविद्यालयांकडून द्यायचे होते. महाविद्यालयांच्या हातात गुण असल्याने त्यांनी बहुतांश विद्यार्थ्यांना ५० पैकी ५० गुण दिले. इतर ५० गुणांसाठी बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. यामध्ये ५० पैकी २५ प्रश्न सोडवायचे होते. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण देण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांनी पन्नासही प्रश्न सोडवले. दुपटीने प्रश्न असल्याने एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकले तरी त्याची भरपाई दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरातून होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचे जाणकारांचे मत आहे.