उपराजधानीत कांजण्या (चिकन पॉक्स) या संसर्गजन्य आजाराने लहान मुलांसह सगळ्याच वयोगटातील नागरिकांनाही ग्रासले असल्याचे धक्कादायक चित्र आहे. मेडिकल, मेयो व डागा या शासकीय रुग्णालयांत रोज पन्नासवर कांजण्याच्या रुग्णांची नोंद होत असून, खासगी रुग्णालयात त्याहून जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. हा आजार नियंत्रणात आणण्याची जबाबदारी असलेली महापालिका या कामात अपयशी ठरल्याचा ठपका नागपूरकरांनी ठेवला आहे.
कांजण्या हा आजार ‘व्हेरिसेला झोस्टर’ या विषाणूपासून होतो. पूर्वीच्या काळात हा आजार ५ वर्षांच्या आतल्या मुलांना प्रामुख्याने होत असल्याचे निदर्शनात येत होते. परंतु हल्ली मोठय़ा वयाच्या मुलांसह नागरिकांमध्येही हा आजार आढळत असल्याचे धक्कादायक चित्र नागपुरात दिसत आहे. या रुग्णाला १ ते २ दिवसांहून जास्त काळ अंगात ताप राहतो. पाय, पोट, पाठीसह अंगाच्या वेगवेगळ्या भागावर लहान लहान फोड येतात. या फोडांमधून पाण्यासारखा स्त्राव वाहत असतो. फोड फुटल्यावर तेथे काळसर रंगाचा डागही पडतो. हा आजार भर उन्हाळ्यात होतो. सध्या नागपूरसह विदर्भात उन्हाळ्याची चाहूल लागताच या आजाराने थैमान घातल्याचे दिसत आहे.
नागपुरात आढळणाऱ्या रुग्णांमध्ये १० ते १४ वयोगटातील मुलांची संख्या जास्त आहे. लहान वयात या आजाराचे गांभीर्य कमी असले तरी मोठय़ा वयात आजार झाल्यास वैद्यकीयदृष्टय़ा तो जास्त गंभीर समजला जातो. त्यातच शहरात बऱ्याच महिलांमध्येही हा आजार आढळत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हा आजार एका रुग्णापासून दुसऱ्या रुग्णामध्ये झपाटय़ाने वाढतो. कांजण्यांनी ग्रस्त झालेल्या रुग्णाचा फोडाने दूषित झालेल्या वस्त्राचा स्पर्श दुसऱ्या सामान्य व्यक्तीला झाल्यासही आजाराची लागण होण्याची शक्यता बळावले. या आजारावर नियंत्रणाकरिता वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेऊन रुग्णांनी योग्य काळजी घेण्याची गरज आहे.

योग्य काळजी घ्या -डॉ. अविनाश गावंडे
नागपुरात लहान मुलांमध्ये कांजण्या हा संसर्गजन्य आजार वाढला आहे. हे रुग्ण योग्य उपचाराने बरे होतात. कांजण्यावर नियंत्रणाकरिता इतरांनी या रुग्णापासून थोडे दूर राहायला हवे. या आजाराकरिता लसीकरण उपलब्ध असून ते बाळाला देणे फायद्याचे आहे. या रुग्णाचे शरीर नित्याने स्वच्छ ठेवणे गरजेचे असून, त्याला जास्त प्रोटीनयुक्त अन्न देण्याची गरज आहे. या रुग्णाने योग्य आराम करण्याची गरज असून योग्य काळजी घेतल्यास रुग्ण लवकर बरा होतो, असे मत शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केले.

आजाराची लक्षणे
ताप, शरिरावर फोड येणे, अंगदुखी, खाज सुटणे, सर्दी, खोकला.