देवेश गोंडाणे

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-क पदासाठी २८ फेब्रुवारीला झालेल्या परीक्षेतील गोंधळानंतर आज मंगळवारी जाहीर झालेल्या दहा पदांच्या निकालावरही संशयाचे ढग दाटले आहेत. निवड यादीतील अनुक्रमानुसार बैठक क्रमांकाचे आणि आजूबाजूला बसणारे उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यांना सारखे गुण मिळाल्याचे दिसून येत आहे. यामुळे निकालात गौडबंगाल झाल्याचा आरोप परीक्षार्थींकडून होत असून निकाल आणि ‘अ‍ॅन्सर की’ एकाच दिवशी जाहीर करणे, निकालामध्ये विद्यार्थ्यांची नावे नसण्यावरही आक्षेप घेतला जात आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट क पदभरतीसाठी ४ लाख २३ हजार उमेदवारांनी अर्ज केले. परंतु, नियोजनाचा अभाव आणि केंद्र वाटपातील त्रुटींमुळे केवळ १ लाख ३३ हजार उमेदवारांनाच परीक्षा देता आली. यातील अवैद्यकीय सहायक, गृहवस्त्रपाल, नळ कारागीर, भांडार वस्त्रपाल, शिंपी, दूरध्वनी चालक, सहायक परिचारिका प्रसाविका, प्रयोगशाळा सहायक, वीजतंत्री (परिवहन), वीजतंत्री (ग्रेड पे १९००) या दहा पदांचा निकाल आज मंगळवारी जाहीर करण्यात आला. परीक्षेतील उणिवांचा परिणाम निकालावरही दिसून आला आहे.

परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने याआधी प्रकाशित केले होते. अनेक केंद्रांवर एका सरळ बाकावर आठ ते दहा परीक्षार्थींनी पेपर सोडवला.  त्यांच्या पाठीमागच्या बाकावरही तशीच व्यवस्था होती. परीक्षेतील या  चुकांचा परिणाम निकालावर दिसत आहे. आजूबाजूला बसलेले उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना मिळालेले गुणही सारखे आहेत. नळ कारागीर पदाच्या निवड यादीनुसार बैठक क्रमांक १५८१९१००२९, ३०, ३३ असे तीनही उमेदवार उत्तीर्ण झाले असून या तिघांनाही १०० गुण मिळाले आहेत. याचप्रमाणे बैठक क्रमांक २४८१९१०१२९, ३३, आणि ६६ या उमेदवारांना १२० गुण मिळाले आहेत. याप्रमाणे दूरध्वनी चालक पदाच्या निवड यादीमध्ये बैठक क्रमांक १७०१६१००४२, ४५,४६,४८,४९,५३,५५ या क्रमांकाचे उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यांचेही गुण जवळपास सारखे आहेत. परीक्षा प्रक्रियेतील उणिवांमुळे अशा पद्धतीने उमेदवार उत्तीर्ण झाले असून अन्य परीक्षार्थींवर अन्याय झाल्याचा आरोप होत आहे. शिवाय संपूर्ण भरतीप्रक्रियाच वादात अडकल्याने ती रद्द करावी, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट राईट्सचे महेश बडे यांच्यासह अनेक परीक्षार्थींनी केली आहे.

परीक्षेच्या मानक कार्यपद्धतीचा भंग

निकाल आणि ‘अ‍ॅन्सर की’ मंगळवारी एकाच दिवशी जाहीर करण्यात आली. परीक्षेच्या मानक कार्यपद्धतीनुसार परीक्षेच्या काही दिवसानंतर ‘अ‍ॅन्सर की’ जाहीर करण्यात येते. या ‘अ‍ॅन्सर की’नुसार परीक्षार्थींना त्यांनी सोडवलेल्या उत्तरांची तपासणी करता येते. शिवाय ‘अ‍ॅन्सर की’मधील उत्तरांवर समाधान न झाल्यास  त्यावर आक्षेप घेण्याची संधी दिली जाते. यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जातो. मात्र, आरोग्य विभागाचा निकाल आणि ‘अ‍ॅन्सर की’ एकाच दिवशी जाहीर करण्यात आल्याने परीक्षार्थींकडून विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. याशिवाय निकाल यादीमध्ये उमेदवारांचा केवळ बैठक क्रमांक देण्यात आला असून नावाचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे परीक्षा घेणारी खासगी कंपनी आणि आरोग्य विभागाने उत्तीर्ण उमेदवारांची नावे लपवल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

आक्षेप काय?

*  निकालात परीक्षार्थीचे नाव, त्यांचा विभाग, जिल्ह्याचा उल्लेख नाही.

*  परीक्षा केंद्राचे नावही दिलेले नाही.

* संशयित उमेदवार उत्तीर्ण झाल्याची शंका.

*  ‘अ‍ॅन्सर की’ आणि निकाल एकाच दिवशी.

* आजूबाजूला बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण.