करोनाग्रस्तांची गैरसोय टळणार

नागपूर :  एकाच ठिकाणी करोना  रुग्णाला माहिती मिळून त्याची तपासणी व्हावी, या दृष्टीने शहरातील सर्व चाचणी केंद्रावरच बाह्य़ रुग्ण विभाग करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेचे शहरात ५० चाचणी केंद्र आहेत.

चाचणी केंद्रावर अहवाल सकारात्मक आल्यावर रुग्णाने गृहविलगीकरणात राहायचे की रुग्णालयात दाखल व्हावे, याबाबत योग्य माहिती दिली जात नसल्यामुळे अनेक रुग्ण वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात. चाचणी झाल्यावर त्यांचा अहवाल वेळेत मिळत नाही. अहवाल मिळाल्यानंतर तपासणी लवकर होत नाही. अशा रुग्णांमुळे संसर्ग वाढला आहे.

कुठल्या रुग्णालयात दाखल व्हावे, याबाबत अनेकांना माहिती दिली जात नाही. शासकीय व महापालिकेच्या रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्यामुळ रुग्णांना अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता ज्या भागात चाचणी केंद्र सुरू

करण्यात आले आहे त्याच ठिकाणी बाह्य़ रुग्ण विभाग सुरू करून त्याच ठिकाणी  अहवाल मिळाल्यावर गृहविलगीकरणात राहायचे असेल तर तपासणी करून औषध देणे, घरावर लावण्यात येणारे स्टीकर आणि इतर माहिती दिली जाणार आहे. शिवाय रुग्णालयात दाखल करायचे असेल तर संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधून त्यांच्याकडे खाटा उपलब्ध आहे की नाही, याची माहिती दिली जाणार आहे.

महापालिकेकडून २५ नवीन रुग्णवाहिका

शहरात करोना रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याची ओरड  झाल्यानंतर महापालिकेने २५ नवीन रुग्णवाहिका बुधवारपासून नागरिकांच्या सेवेत रुजू केल्या आहेत. महापालिकेत सध्या ४० रुग्णवाहिका कार्यरत असून त्यामध्ये २५ रुग्णवाहिकांची नव्याने भर पडली आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या बघता रुग्णवाहिकेची कमतरता जाणवत होती. रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे चार दिवसांपूर्वी एका रुग्णांचा मृत्यू झाला होता. आयुक्तांच्या निर्देशानुसार करोनाबाधितांसाठी प्रत्येक झोनमध्ये चार रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. करोना केअर सेंटर आणि महापालिका मुख्यालयात देखील या रुग्णवाहिका उपलब्ध राहतील. गरजेनुसार करोनाबाधितांसाठी झोन कार्यालयामध्ये फोन करून  मागविता येईल. ही रुग्णवाहिका नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी संबंधितांनी झोन कार्यालयामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेत आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन

महापालिकेतील आरोग्य विभागात कर्मचारी व परिचारिका करोनाच्या काळात दिवसरात्र काम करत असताना त्यांना मानधन वाढवून दिले जात नसल्यामुळे बुधवारी महापालिका परिसरात कामगार नेते जम्मू आनंद यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. नागपूर महापालिका एम्पॉलॉईज असोसिएशनने या आंदोलनाला पाठिंबा दिला. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

संपर्क क्रमांक

करोना चाचणी सकारात्मक असेल आणि लक्षणे असतील तर रुग्णालयात दाखल होण्यासाठी आणि कुठल्या रुग्णालयात खाटांची उपलब्धता आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर  ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर संपर्क साधा. करोना संबंधित इतर मार्गदर्शनासाठी ०७१२-२५५१८६६ व ०७१२-२५३२४७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

करोनाबाधितांचे समुपदेशन

लक्षणे नसलेल्या करोना रुग्णांसाठी जर घरात व्यवस्था असेल तर गृहविलगीकरण हाच पर्याय असल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशन नागपूर शाखेचे माजी अध्यक्ष आनंद काटे यांनी व्यक्त केले. सकारात्मक अहवाल आल्यानंतर सतरा दिवस गृहविलगीकरणा नंतर पुन्हा चाचणीची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बुधवारपासून महापालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने गृह विलगीकरणात असलेल्या करोना रुग्णांसाठी ‘कोविड संवाद’ या शीर्षकांतर्गत ‘फेसबुक लाईव्ह’चे आयोजन करण्यात आले.

झोन पातळीवर नियंत्रण कक्ष 

महापालिकेने झोनस्तरावर करोना नियंत्रण कक्ष स्थापित केले आहे. करोनासाठी अधिकच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व पर्यवेक्षणासाठी संबंधित झोनच्या सहाय्यक आयुक्तांची करोना नियंत्रण कक्षाचे नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. या निर्णयानुसार दहा झोनच्या सहाय्यक आयुक्तांना करोना रुग्णांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, करोना चाचणी केंद्र स्थापित करून मोठय़ा प्रमाणात चाचण्या करणे, चाचणी केंद्राचे दैनंदिन व्यवस्थापन करणे, खासगी रुग्णालयातील खाटांचे व्यवस्थापन करणे, रुग्णवाहिका व शववाहिका यांचे व्यवस्थापन करणे, मृत करोना रुग्णांचे डेथ अनलिसीस करणे, प्रतिबंधित क्षेत्रातील अनुषंगिक कार्यवाही करणे, तथा परिसर निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.