छोटे, मध्यम व्यावसायिक अडचणीत; सर्वसामान्यांनाही फटका

नागपूर : वास्तविक परिस्थिती लक्षात न घेता बाजारपेठा आणि इतरही ठिकाणी टाळेबंदीच्या नियम पालनासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने सुरू केलेली कारवाई छोटे व्यापारी, ग्राहक, दुचाकी चालकांसाठी अतिरेकी स्वरूपाची ठरू लागली आहे. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, गर्दी कमी करण्यासाठी ही मोहीम राबवली जात असली तरी विविध राजकीय पक्षांची आंदोलने, नेत्यांचे दौरे यात शारीरिक अंतर राखण्याचे सर्रास उल्लंघन केले जात असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. नागपूरमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत तसेच मृत्यूमध्ये होत असलेली वाढ सर्वासाठीच चिंतेची बाब ठरली आहे. पुन्हा टाळेबंदी लागू करायची का, यावरही पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून विचार होत आहे. त्यापूर्वी टाळेबंदीच्या संदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली आहे. नियम मोडणाऱ्यावर दुपटीने दंड आकारला जात आहे. दुचाकीवर दोन जण बसले असतील तर दंड, दुकानात थोडी जरी गर्दी झाली तर दंडात्मक कारवाई, रात्री ९नंतर थोडा वेळ जरी दुकान उघडे असेल तर दुप्पट दंड. एकप्रकारे दंड वसुलीचा परवाना मिळाल्यागत यंत्रणा वागत असल्याने त्यांच्याविषयी संताप व्यक्त होऊ लागला आहे.

मुळात व्यापाऱ्यांना एकदिवसाआड दुकाने उघडायची आहेत. दुसरीकडे ग्राहक बाजारपेठेकडे फि रकत नाहीत. नागपुरातील बर्डी, सदर, गोकूळपेठ, खामला, रामदासपेठ या भागातील दुकानात दोनहून अधिक माणसे उभी राहण्याची जागा नाही. बर्डीवरील मोबाईल मार्केट असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा बाजार असो सर्वत्र दुकानात ग्राहकांना दाटीवाटीनेच उभे राहावे लागते. शहरातील विविध चौकातील दुकानेही याला अपवाद नाहीत. अशा परिस्थितीत एकाच वेळी तीन-चार ग्राहक दुकानात आले तर दुकानदारांनाच दंडित केले जाते. बाजारपेठेत ग्राहक दुपारी चारनंतरच येणे पसंत करतो. विशेषत: महिला वर्गासाठी ही वेळ सोयीची आहे. त्यामुळे या काळात दुकानात गर्दी होते अशा वेळी ग्राहक दुकानात आले व थोडी जरी गर्दी वाढली तर कारवाई तर होणार नाही ना, याची भीती वाटते. आमचे लक्ष कारवाई करणाऱ्या पथकाकडेच असते, अशी प्रतिक्रिया बर्डीवरील लॅपटॉप विक्रेत्याने व्यक्त केली.

दत्तात्रयनगरातील आईसक्रिम पार्लरचे संचालक उमेश कडू म्हणाले, रात्री आठनंतरच कुटुंबासह ग्राहक दुकानात येतात. एका कुटुंबाची संख्या तीन ते चार जणांची असते. दोन कुटुंब आले आणि थोडावेळ बसले तरी दुकानात गर्दी होते. अशावेळी ग्राहकांना लवकर उठण्याची विनंती करावी लागते. ते त्यांना आवडत नाही. याचा व्यवसायावर परिणाम होतो.

सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. ऑटोही पूर्वीइतके धावत नाहीत. त्यामुळे महिला त्यांचे मुले पतीसोबत बाजारपेठेत एका दुचाकीवर जातात. मात्र दोन दिवसांपासून पोलीस अडवून दंड ठोठावत आहे. शहराच्या सीमावर्ती भागातील शेतकरी एकाला सोबत घेऊन शेतमाल दुचाकीवर शहरात विक्रीसाठी आणतात. पोलीस त्यांच्यावर दंड आकारतात. खापरी, बुटीबोरी येथून येणाऱ्या शेतकऱ्यांना वर्धा मार्गावरील प्राईड हॉटेलपुढे रोज कारवाईला तोंड द्यावे लागते.

व्यवसाय करायचा कसा?

‘‘एकीकडे एक दिवसाआड दुकाने उघडण्याला परवानगी दिली आहे. दुसरीकडे दुकाने लवकर बंद करण्यास सांगितले जात आहे. ग्राहकांची गर्दी झाली तर कारवाई केली जात आहे. व्यवसाय करायचा कसा? कर्जाची परतफेड, दुकानातील कर्मचाऱ्यांचा खर्च यासाठी पैसे आणायचे कोठून? संसर्ग रोखण्यासाठी उपायोजनेला कोणाचाही विरोध नाही. पण उपाययोजनांच्या नावाखाली सुरू असलेला अतिरेक असह्य़ झाला आहे. व्यवसाय बंद होण्याची वेळ आली आहे.’’

– जितू केवलरामानी, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, जागनाथ बुधवारी.

अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन वाईट

‘मध्यम गटातील व्यापाऱ्यांकडे बघण्याचा अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन वाईट आहे. ते त्यांना अपराधी समजतात. व्यवसाय करणे चूक आहे का?  ते सुद्धा अडचणीत आहेत. अशावेळी त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. उपाययोजनेला त्यांचा विरोध नाही. सरकारने यात लक्ष घालावे.

– वेदप्रकाश आर्य, सदस्य, विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्स

नागरिकांनी सहकार्य करावे

‘‘करोनावर मात करायची असेल तर या संदर्भातील प्रतिबंधक उपाययोजना आणि नियमांचे पालन करणे  आवश्यक आहे. नागरिकांनी याला सहकार्य करावे.’’

– संदीप जोशी, महापौर.