* रविवारी रात्रीपासून पन्नास बाधितांची भर * कारागृहातील आणखी १५ जणांना बाधा

नागपूर : उपराजधानीत रविवारी रात्री अकरा ते सोमवारी रात्री ९ वाजतापर्यंत तब्बल ६४ नवीन करोनाबाधितांची भर पडली असून आजपर्यंत आढळलेल्या एकूण करोना बाधितांची संख्या १,८१३ वर पोहचली आहे. नवीन बाधितांमध्ये मध्यवर्ती कारागृहातील १५ जणांचा समावेश असून त्यामुळे आजपर्यंत करोनाग्रस्त आढळलेल्या कारागृहाशी संबंधित व्यक्तींचीही संख्या १३६ वर पोहचली आहे.

आज सोमवारी नवीन बाधित आढळलेल्यांमध्ये कमाल चौक आणि कोराडी रोडवरील प्रत्येकी एका व्यक्तीचा अहवाल खासगी प्रयोगशाळेतून सकारात्मक आला. हंसापुरी, भांडेवाडी, सूर्यनगर हज हाऊस, तेलंगखेडी, मिनीमातानगर, येथील प्रत्येकी एकाला बाधा झाल्याचे आढळले.  बजेरियातील २ संशयितांच्या घशातील द्रव्याचे नमुने सकारात्मक आले. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानालाही बाधा झाल्याचे मेयोतील प्रयोगशाळेतून पुढे आले. तब्बल तीन महिन्यांनी पुन्हा खामल्यात नवीन बाधित आढळला आहे. याशिवाय मध्यप्रदेशातील सिवनीचा एक रुग्ण आहे.

लसीसाठी  १२ ते १५ महिन्यांची प्रतीक्षा – डॉ. अरबट

सध्या प्रसारमाध्यमांवर ‘आयसीएमआर’द्वारा  १५ ऑगस्टपूर्वी करोना प्रतिबंधित लस तयार करण्याच्या सूचनेचे पत्र प्रसारित होत आहे. परंतु कोव्हॅक्स लसीवर मानवी चाचणीचे काम सुरू आहे. लस बनवण्यासाठी  किमान १२ ते १५ महिन्यांचा कालावधी  लागू शकतो, असे मत विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष व  श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अरबट यांनी व्यक्त केले. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ही लस निर्मितीसाठीचे १३ प्रयोग मानवी चाचणीच्या टप्प्यात आहेत. मॉडर्न इनकॉर्पोरेशन (दुसरा टप्पा), चीनची सिनोवॅक बायोटेक (दुसरा टप्पा), युकेची ऑक्सफोर्ड झेनेका (दुसरा/ तिसरा टप्पा), फायजर बेनटेक (दुसरा टप्पा) आणि अन्य काही कंपन्या लसनिर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. करोना लसनिर्मितीचे हे १३ प्रयोग यशस्वी ठरले, तर त्यांना नोव्हेंबर  २०२० पर्यंत मान्यता मिळू शकते. मात्र, मोठय़ा प्रमाणात लस निर्मिती आणि सामान्य लोकांना उपलब्ध करून देण्यासाठीची साखळी बघता पुढील वर्षीच ही लस बाजारात येऊ  शकेल. जागतिक आरोग्य संघटनेची सॉलिडेरिटी ट्रायल, युकेची रिकव्हरी ट्रायल आणि अमेरिकेची ऑपरेशन वार्प स्पीड या अग्रगण्य चाचण्या आहेत.

कोव्हॅक्स आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट

ऑफ व्हायरोलॉजी आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल याच्या विद्यमाने तयार होत आहे. ही लस करोना विषाणूच्या मृत पेशींपासून तयार करण्यात येत आहे. सध्या मानवी चाचणीला परवानगी मिळाली असून चाचण्या सुरू झालेल्या नाहीत.  यावरून असे सांगता येईल की, १५ ऑगस्टला लस सामान्य व्यक्तींसाठी  उपलब्ध करून देणे शक्य नाही, असेही डॉ. अरबट म्हणाले.

एक कैदी न दिसल्याने प्रशासनाची दमछाक

मेडिकलमध्ये दाखल असलेल्या चारपैकी एक बाधित कैदी खाटेवरून अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे त्याला शोधण्यात मेडिकल प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. येथे तळमजल्यावरच कैद्यांवर उपचार सुरू होते. त्यामुळे ते पळून झाल्याचा धोका बघता चारही कैद्यांना मेयो रुग्णालयात हलवण्यात आले. येथे चवथ्या माळ्यावर वेगळ्या वार्डात कैद्यांवर उपचाराची सोय करण्यात आली आहे. येथे सगळे पुरुष संवर्गातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना सेवेवर लावले गेले आहे. तर कैदी पळू नये म्हणून दोन पोलिसांना वयक्तिक सुरक्षा संच घालून येथे बसवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त करोनाग्रस्तांच्या भेटीला

करोनाबाधितांना चांगले उपचार मिळावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत महापालिका आयुक्तांसह इतर सदस्यांच्या जिल्हा टास्कफोर्सचे गठन करण्यात आले आहे. या समितीने आज सोमवारी मेडिकल, मेयोतील कोविड रुग्णालयांतील  बाधितांशी थेट संवाद साधला. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे वैयक्तिक सुरक्षा संच (पीपीई किट) घालून जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधीसह येथे गेले होते. या टास्कफोर्सची पहिली बैठक मेडिकलमध्ये आज झाली.

लसीच्या चाचणीची यादी तयार

करोना प्रतिबंधित लसीची चाचणी गिल्लुरकर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात मंगळवारपासून सुरू होणार होती. परंतु आता प्रथम दिल्ली एम्ससह शासकीय रुग्णालयांमध्ये ही चाचणी सुरू होणार आहे.

महावितरणचे १० कर्मचारी बाधित

चक्रीवादळामुळे रायगडची वीज यंत्रणा कोलमडली होती. नागपूर आणि वर्धा जिल्ह्य़ातील ४२ वीज कर्मचारी तेथे वीज यंत्रणा सुरळीत करण्यासाठी  गेले होते. यातील नागपूर शहरातील ४, ग्रामीण भागातील ६ तर वर्धा जिल्ह्य़ातील ९ असे एकूण १९ जणांना करोना असल्याचे स्पष्ट झाले. त्यात दोन अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.