२४ तासांत १० रुग्णांचा मृत्यू

नागपूर :  १० रुग्णांच्या मृत्यूंसह गुरुवारी दिवसभरात १,९७९ नवीन करोनाग्रस्त आढळल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. नवीन रुग्णांमध्ये शहरातील १ हजार ६०३, ग्रामीण ३७३, जिल्ह्य़ाबाहेरील ३ अशा एकूण १ हजार ९७९ रुग्णांचा समावेश आहे.

नवीन रुग्णांमुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख ३० हजार ९६४, ग्रामीण ३२ हजार ९६, जिल्ह्य़ाबाहेरील ९७२ अशी एकूण १ लाख ६४ हजार ३२ रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात ६, ग्रामीण १, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला.

नवीन मृत्यूमुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ८४७, ग्रामीण ७८८, जिल्ह्य़ाबाहेरील ७९० अशी एकूण ४ हजार ४२५ रुग्णांवर पोहोचली आहे.

सकारात्मक अहवालाचे प्रमाण १८.९२ टक्के

शहरात गुरुवारी दिवसभरात ७ हजार ५८२, ग्रामीण २ हजार ५३२ अशा एकूण १० हजार ११४  चाचण्या करण्यात आल्या. त्याचा अहवाल शुक्रवारी अपेक्षित आहे. परंतु बुधवारी  १० हजार ४५८ चाचण्यांपैकी गुरुवारी १,९७९ व्यक्तींना करोना असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. या सकारात्मक अहवालाचे प्रमाण १८.९२ टक्के आहे.

रुग्णालयांतील रुग्णसंख्या १,८४५ वर

शहरात १० हजार ८१६, ग्रामीण २ हजार ३७२ असे एकूण १३ हजार १८८ सक्रिय रुग्ण आहेत. एकूण रुग्णांपैकी ९ हजार ३६४ रुग्णांवर गृह विलगीकरणात तर  १,८४५  गंभीर रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गंभीर रुग्ण वाढत असल्याने शासकीय व खासगी रुग्णालयांवर पुन्हा ताण वाढू लागला आहे.

करोनामुक्तांची संख्या ९० टक्क्यांहून खाली 

दिवसभरात शहरात ७००, ग्रामीण २४७ असे एकूण ९४७ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख १८ हजार ४३, ग्रामीण २८ हजार ३७६ अशी एकूण १ लाख ४६ हजार ४१९ व्यक्तींवर पोहोचली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवीन  बाधित  आढळत असल्याने करोनामुक्तांचे प्रमाण  ८९.२६ टक्क्यांवर घसरले आहे.