सहा दिवसांतच शंभर रुग्णांची नोंद

नागपूर : उपराजधानीत करोनाग्रस्तांची संख्या वाढतच असून मंगळवारी या बाधितांच्या संख्येने तीनशेचा टप्पा ओलांडला. यापैकी शंभर रुग्ण हे केवळ सहा दिवसांमध्येच आढळल्याने नागपूरकरांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे बहुतांश रुग्ण विलगीकरणातील असल्याने संक्रमणाचा धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला  आहे.

मंगळवारी आढळलेल्या नवीन सहा रुग्णांमुळे शहरातील बाधितांची संख्या आता थेट ३०६ वर पोहचली आहे. नवीन रुग्णांमध्ये एका सतरंजीपुरातील सिंबॉसिसमध्ये विलगीकरणातील ४२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या व्यक्तीचा पहिला नमुना नकारात्मक असला तरी चौदा दिवसांनी त्याला विषाणूची बाधा असल्याचे स्पष्ट झाले. मोमीनपुरातून एक ५२ वर्षीय महिला मेयोच्या बाह्य़रुग्ण विभागात उपचाराला आली होती. तिला दाखल करून मेयो प्रशासनाने नमुने घेतले असता तिलाही विषाणूची बाधा असल्याचे स्पष्ट झाले. मोमीनपुरा परिसरातून ताब्यात घेतलेल्या चौघांनाही विषाणूची बाधा असल्याचे नीरीच्या प्रयोगशाळेतील अहवालाच्या तपासणीतून पुढे आले आहे.

तीन गर्भवतींना करोना

मोमीनपुरा परिसरात मोठय़ा संख्येने बाधित  आढळत असल्याने महापालिकेकडून या भागातील सर्व गर्भवतींची  तपासणी केली जात आहे. मंगळवारच्या अहवालात येथील तीन गर्भवतींमध्ये विषाणूची बाधा आढळल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले. तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.

करोनामुक्तांचेही शतक

उपराजधानीत विषाणू बाधितांचे त्रिशतक झाल्याची नोंद झाली त्याचवेळी करोनामुक्त झालेल्यांचेही मंगळवारी शतक नोंदवण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये मेडिकल, मेयो रुग्णालयातील यशस्वी उपचारावर विश्वास वाढला आहे. करोनामुक्त झालेल्यांमध्ये मेडिकलचे ४८ आणि मेयोतील ५२ जणांचा समावेश आहे. यापैकी तीन जणांना मंगळवारी रुग्णालयातून सुट्टी दिली गेली.