२४ तासांत ५४ मृत्यू; नवीन ३,७५८ रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ५४ करोनाबाधितांचा मृत्यू झाला तर ३ हजार ७५८ नवीन रुग्णांची भर पडली. सोमवारी जिल्ह्य़ातील ११ हजार ८५८ नमुन्यांच्या चाचणीत मंगळवारी आढळलेल्या नवीन बाधितांची संख्या बघता सकारात्मक अहवालांचे प्रमाण तब्बल ३१.६७ टक्के नोंदवण्यात आले.

जिल्ह्य़ात मंगळवारी १४ हजार ५७६ चाचण्या झाल्या. त्यांचे अहवाल बुधवारी येणे अपेक्षित आहे. त्यात शहरातील ९ हजार १९, ग्रामीणच्या ५ हजार ५५७ चाचण्यांचा समावेश आहे.  सोमवारी जिल्ह्य़ात तपासलेल्या ११ हजार ८५७ नमुन्यांत ३ हजार ७५८ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले. २४ तासांत  शहरात २ हजार ६५२, ग्रामीण ७७३, जिल्ह्य़ाबाहेरील ६ असे एकूण ३ हजार ७५८ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख ९३ हजार ४५०, ग्रामीण ५४ हजार ३७०, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ६३ अशी एकूण २ लाख ४८ हजार ८८३ रुग्णांवर पोहोचली.  दिवसभरात शहरात २७, ग्रामीण २१, जिल्ह्य़ाबाहेरील ६ असे एकूण ५४ मृत्यू झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ३ हजार ४२४, ग्रामीण १ हजार १३३, जिल्ह्य़ाबाहेरील ८८१ अशी एकूण ५ हजार ४३८ रुग्णांवर पोहोचली आहे.

करोनामुक्तांची संख्या दोन लाख पार

शहरात दिवसभरात २ हजार ५३२, ग्रामीण ७७३ असे एकूण ३ हजार ३०५ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंत करोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या १ लाख ६२ हजार ८२, ग्रामीण ३९ हजार ८३४ अशी एकूण २ लाख १ हजार ९१६ व्यक्तींवर पोहोचली आहे.  बाधितांच्या तुलनेत जिल्ह्य़ात करोनामुक्तांचे प्रमाण ८१.१३ टक्के आहे.

सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या ४१,५२९ वर

शहरात २८ हजार ६८६, ग्रामीण १२ हजार ८४३ असे एकूण ४१ हजार ५२९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ३५ हजार ७७५ रुग्णांवर गृह विलगीकरणात तर गंभीर संवर्गातील ५ हजार ७५४ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

विदर्भात करोनाचे ९२ मृत्यू

विदर्भात मंगळवारी २४ तासांत करोनाचे ९२ रुग्ण दगावले तर दिवसभरात तब्बल ७ हजार ९९८ नवीन रुग्णांची भर पडली. नागपूर जिल्ह्य़ात सर्वाधिक ५४ मृत्यू (५८.६९ टक्के) झाले. त्यात शहरातील २७, ग्रामीण २१, जिल्ह्य़ाबाहेरील ६ रुग्णांचा समावेश होता. नागपूर जिल्ह्य़ात दिवसभरात ३ हजार ७५८ नवीन रुग्ण आढळले. वर्धा जिल्ह्य़ात १० रुग्णांचा मृत्यू तर ३८५ नवीन रुग्ण आढळले. भंडाऱ्यात ८ मृत्यू, ८६८ रुग्ण आढळले. अमरावतीत १ मृत्यू ३११ रुग्ण आढळले. यवतमाळला ७ मृत्यू तर ३२७ रुग्ण आढळले. चंद्रपूरला २ मृत्यू तर ४९२ रुग्ण आढळले. गडचिरोलीत मृत्यू नाही, परंतु १४८ रुग्ण आढळले. वाशीमला २ मृत्यू तर १६७ नवीन रुग्ण आढळले. अकोल्यात ४ मृत्यू तर २६१ रुग्ण आढळले. बुलढाण्यात २ मृत्यू तर ८९१ रुग्णांची भर पडली. गोंदियात २ मृत्यू तर ३९० रुग्ण आढळले.

‘एम्स’मध्ये आणखी ३० खाटांची भर

अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेत (एम्स) मंगळवारी रात्री उशिरापर्यंत करोना बाधित रुग्णांसाठी आणखी ३० नवीन खाटांची भर पडणार अशी माहिती होती. सध्या एम्समध्ये  गंभीर  रुग्णांसाठी ६५ ऑक्सिजन व काही व्हेंटिलेटर असलेल्या खाटा उपलब्ध आहेत.  दोन दिवसांपूर्वी येथे ७० नवीन खाटा नागपूर महापालिकेकडून उपलब्ध झाल्यावर धर्मशाळा परिसरात त्या उपलब्ध करण्यात आल्या. त्यात आणखी ३० खाटांची भर मंगळवारी रात्रीपर्यंत पडणार होती. या खाटांवर बुधवारपासून रुग्ण घेतले जाणार आहेत. या धर्मशाळा परिसरातील १०० खाटांपैकी सुमारे २० ते ३० खाटांवर प्रशासनाकडून ऑक्सिजनची सोय केली जात आहे. परंतु इतर खाटांवर ज्या रुग्णांच्या ऑक्सिजनचे प्रमाण चांगले असून त्यांना इतर त्रास आहे, असेच रुग्ण येथे घेतले जाणार आहेत.