बारा वर्षांतील आकडेवारी, रेल्वे व वनविभाग असंवेदनशील 

नागपूर : घनदाट जंगलातून जाणाऱ्या गोंदिया-चंद्रपूर-बल्लारशा रेल्वेमार्गावर गेल्या एक तपात सुमारे ५०च्यावर वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे २००८ ते २०१८ या दहा वर्षांत २४ वन्यप्राणी मृत्युमुखी पडले. त्यानंतरही खबरदारीच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत रेल्वेखाते आणि पाठपुराव्याबाबत वनखाते गंभीर नाही.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या  पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात हा रेल्वे मार्ग येत असूनही खबरदारीच्या उपाययोजनांबाबत दोन्ही विभाग असंवेदनशील आहेत. वाघांचा वावर असणाऱ्या या पट्टय़ात गेल्या बारा वर्षांत पाच वाघ, दोन बिबट आणि इतर वन्यप्राण्यांचा बळी गेला आहे. टाळेबंदीच्या कालावधीत १३ रानडुकरांचा मृत्यूही येथे झाला. बल्लारशा, जुनोना, सिंदेवाही, तळोधी, नागभिड, ब्रम्हपुरी या वनक्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वेरुळावर हे मृत्यू झाले आहेत. १५ नोव्हेंबर २०१८ मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना वाघाच्या तीन बछडय़ांचा मृत्यू झाला. त्यानंतर या मार्गावर खबरदारीच्या उपाययोजनांसाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यात जुनोना, मामला, बाबूपेठ, लोहारा, मिंडाळा, ब्रम्हपुरी या क्षेत्रात १९ ठिकाणी रेल्वेची गती कमी करण्याची आवश्यकता होती. तर ब्रम्हपुरी व चंद्रपूर विभागातील मामला, जुनोना, सिंदेवाही, चिचपल्ली, तळोधी, बाळापूर, नागभिड परिक्षेत्रातील अतिसंवेदनशील वनक्षेत्रात नवीन भुयारी मार्ग सुचवण्यात आले होते. चंद्रपूर वनवृत्ताचे तत्कालीन मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव यांनी या उपाययोजनांबाबत दक्षिणपूर्व मध्य रेल्वेला पत्र लिहिले होते. मात्र, या दोन वर्षांत उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत एकही पाऊल पुढे सरकले नाही.

ताडोबातून कन्हाळगाव व त्यानंतर तेलंगणा आणि आता इंद्रावतीला जोडणारा कॉरिडॉर आहे. येथून ब्रम्हपुरी, चंद्रपूर, पश्चिम चांदा वनविकास महामंडळ, ब्रम्हपुरी वनविकास महामंडळ व प्रादेशिक विभाग या रेल्वेमार्गात येतात. त्यानंतर नवेगाव-नागझिरा या रेल्वेमार्गात येतात. आता तर नागभिड ते नागपूर नॅरोगेजचे ब्रॉडगेज, एके री मार्गाचा दुहेरी मार्ग, डिझेल ते विद्युतीकरण आणि प्रवासी ते मालगाडी वाहतूक असा बदल रेल्वेत होत आहे. त्यामुळे पुढील काळात आव्हाने आणखी वाढणार आहेत. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे.

– बंडू धोतरे,  सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ