उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) येथे पन्नास स्वयंसेवकांना पहिल्यांदा २३ ऑक्टोबरला ऑक्सफोर्डच्या कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा दिली होती. त्यानंतर २८ दिवसांनी १९ नोव्हेंबरपासून दुसरी मात्रा देणे सुरू असून हे काम सोमवारी पूर्ण होईल. चाचणीच्या पहिल्या आणि आता दुसऱ्याही टप्प्यात सर्व स्वयंसेवक सुरक्षित आहेत. या चाचणीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ऑक्सफोर्डच्या लसीची चाचणी शेवटच्या टप्प्यात आहे. या लसीची देशाच्या निवडक केंद्रात चाचणी सुरू असून नागपूरचे मेडिकलही त्यातील एक आहे. मेडिकलमध्ये ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ापासून स्वयंसेवकांची स्क्रिनिंग सुरू झाली. त्यात शहरातील १८ ते ५५ वयोगटातील १५ स्वयंसेवकांना २३ आणि २४ ऑक्टोबरला तर इतर ३५ स्वयंसेवकांना त्यानंतरच्या दिवसांत लस देण्यात आली.

शनिवापर्यंत सुमारे ४७ व्यक्तींना ही लस दिली गेली. आता सोमवापर्यंत २८ दिवस पूर्ण होणाऱ्या सुमारे ३ व्यक्तींना लस दिल्यावर मेडिकलचा हा प्रकल्प पूर्ण होईल. लस दिल्यापासून आजपर्यंत एकाही रुग्णामध्ये आरोग्याबाबत कुठलीही समस्या नोंदवली गेली नाही. त्यामुळे मेडिकलच्या डॉक्टरांमध्ये उत्साह असून आता दुसऱ्या चाचणीनंतर या लसीचा काय सकारात्मक परिणाम होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या नेतृत्वात येथील श्वसनरोग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुशांत मेश्राम आणि वैद्यकीय अधीक्षक व या प्रकल्पाचे उपसमन्वयक डॉ. अविनाश गावंडे या प्रकल्पावर विशेष लक्ष ठेवून आहेत.