नितीन गडकरी यांची माहिती

नागपूर : करोना संकटाच्या काळात प्राणवायू न मिळाल्याने कुणाचे प्राण जाऊ नये यासाठी विदर्भात तालुका व नगर परिषद  क्षेत्रात तसेच विधानसभा मतदारसंघ निहाय प्राणवायू कॉन्स्ट्रेटर बँक सुरू करणार असून धर्मादाय संस्था, सहकारी संस्था, सामाजिक संस्थांना पाच -पाच कॉन्स्ट्रेटर देऊन प्रशिक्षणही देणार. त्यामुळे लोकांचे जीव वाचतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

वैज्ञानिक आणि विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी आभासी कार्यक्रमात गडकरी संवाद साधत होते. संकट कोणतेही असले तरी त्याचा सामना करावा लागतो आणि त्यावर विजयही मिळवावा लागतो. करोनाविरुद्धची लढाई समाजहितासाठी असलेली लढाई आहे. या संकटामुळेच आरोग्य सुविधांवर अधिक काम करण्याची गरज आहे. ५० पेक्षा अधिक रुग्णशय्या असलेल्या प्रत्येक रुग्णालयाने स्वत:चे प्राणवायू प्रकल्प निर्माण करण्याची गरज आहे. प्रत्येक जिल्हा हा प्राणवायू निर्मितीत स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनला पाहिजे. हवेतून प्राणवायूची निर्मिती प्रत्येक रुग्णालयात असली पाहिजे, ती आज गरज आहे.

हवेतून निर्माण करण्यात येणाऱ्या प्राणवायूसाठी विशेष तंत्रज्ञान आहे. तसेच प्राणवायू निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आम्हाला आयात करावा लागतो. विद्यापीठांनी यावर संशोधन करून आयातीसाठी पर्याय निर्माण करावा व या क्षेत्रातही देशाला आत्मनिर्भर करावे. तालुका व नगर परिषद  क्षेत्रात धार्मिक, सामाजिक व सहकारी संस्थांनी प्राणवायू कॉन्स्ट्रेटरची बँक बनवावी. रेमडेसिविरचा तुटवडा लक्षात घेता वर्धा येथून या इंजेक्शनची निर्मिती सुरू केली आहे. तसेच ब्लॅक फंगल इन्फेक्शनसाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनची निर्मितीही वर्धेतून लवकरच होणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. भारताचे योगविज्ञान आणि प्राणायाम संपूर्ण जगात वाखाणले गेले आहे. मी स्वत: रोज प्राणायाम करून याचा अनुभव घेत असल्याचेही गडकरी म्हणाले.