कैलाश शेंडे यांचे संशोधन
चारचाकी वाहनाचा प्रवास सुखद असला तरीही बंद चारचाकी वाहनात अडकणे म्हणजे जीव गमावण्यासारखे आहे. जगभरात चारचाकी वाहनात अडकून, गुदमरून कित्येकांचा जीव गेला आहे. मात्र, आता कुणालाही जीव गमवावा लागणार नाही. बंद वाहनातही तो तेवढाच सुरक्षित राहणार आहे. वेकोलितील एका मेकॅनिकने तब्बल तीन वर्षांच्या मेहनतीनंतर त्या संदर्भातील उपकरण तयार केले आहे.
चारचाकी वाहनाने प्रवास करताना नियोजित स्थळी वाहने उभी करण्याचा प्रश्न कित्येकदा उभा ठाकतो. जागा मिळेल तिथे वाहने उभी करून नियोजन ठिकाणावर पायी जाण्याचा मार्ग अनेकजण पत्करतात. अवघ्या पाच-दहा मिनिटांचे काम असेल आणि सोबत लहान मुले असतील तर त्यांना गाडीतच ठेवले जाते. कधीकधी घरच्याच गाडीत खेळतानाही मुले गाडीत बंद झाल्याचे प्रकार घडले आहेत. अशावेळी गाडी बंद झाली तर मुलांचा श्वास कोंडून गुदमरण्याचा धोका असतो. कित्येकदा अशा घटनासुद्धा घडलेल्या आहेत. अपघातात मोठी माणसेही गाडीत अडकून पडतात आणि अशावेळी त्या अपघातामुळे नव्हे तर गाडीतून बाहेर पडता न आल्याने श्वास कोंडून व्यक्ती मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावर पर्याय शोधण्याचा प्रयत्न आजवर कुणी केला नाही, पण वेकोलिच्या सुंदरनगर, निलजई ओपनकास्टमध्ये वरिष्ठ मेकॅनिक पदावर असलेल्या कैलाश शेंडे यांना तीन वषार्ंपूर्वी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. एक वर्षांपूर्वी त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. वाहनातल्या सीटबेल्टला हे उपकरण जोडलेले असते आणि त्यातून वाहनातील व्यक्तीला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. विशेष म्हणजे त्यासाठी बटण सुरू किंवा बंद करण्याची गरज नाही, तर एकदा हे उपकरण वाहनात बसवले की, वाहनाच्या काचा बंद केल्यानंतर ते आपोआप कार्यान्वित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही बंद काचांमुळे होणारे मृत्यू गांभीर्याने घेऊन त्यावर पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही बाब हेरून कैलाश शेंडे यांनी नुकतेच नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि त्यांना या उपकरणाचे प्रात्यक्षिक दिले. या उपकरणाने तेसुद्धा प्रभावित झाले आहेत. परिवहन कायद्यांची चाचपणी करून व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कैलाश शेंडे यांना दिल्लीला बोलावून यासंदर्भातला निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी कैलाश शेंडे यांना दिले.

‘पेटंट’साठी नोंदणी
तब्बल २९ वर्षांंपासून कैलाश शेंडे वेकोलित कार्यरत आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक उपकरणे तयार केली असून केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. दुचाकी वाहनाची बॅटरी लावून त्यांनी हे उपकरण तयार केले आहे. सोलर प्लेटवरही हे उपकरण कार्यान्वित होते. या उपकरणाला ‘पेटंट’ मिळावे म्हणून त्यांनी नोंदणीसुद्धा केली आहे आणि ते लवकरच मिळेल असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. वाहने उन्हात उभी असतील तर त्यातील तापमान वाढते. त्यातून कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईडचे कार्बन मोनोक्साईडमध्ये रूपांतर होते. हा वायू जीवघेणा ठरतो. या उपकरणामुळे हे विषारी वायू बाहेर फेकले जातात आणि ऑक्सिजनचा पुरवठा आपोआप सुरू होतो.