पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

नागपूर : खरीप हंगामातील रोवणीला सुरुवात झाली असली तरी अजून रब्बी हंगामातील धान खरेदी झाली नाही. शेतकरी धान खरेदीच्या प्रतीक्षेत असून पावसामुळे धानाची नासाडी होण्याच्या भीतीने काही शेतकरी व्यापाऱ्यांना स्वस्त दरात धान विकत आहेत. शासकीय धान खरेदी केंद्रांवर धान साठवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने रब्बी हंगामातील (उन्हाळ्यातील) धान उत्पादक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांचे धान खरेदीअभावी ठिकठिकाणी पडून असून पावसामुळे त्याची नासाडी होत आहे.

राज्य सरकारने धान खरेदी केंद्र सुरू केले आहेत. पाच ते दहा गावे मिळून एक खरेदी केंद्र आहे. परंतु या केंद्राकडे खरेदी केलेले धान ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही, गोदामातही जागा नाही. त्यामुळे खरेदी प्रक्रिया फारच संथगतीने सुरू आहे. पावसामुळे शेतकऱ्यांनी समाजभवनात किंवा शेतात धान ठेवले. आता पावसामुळे या धानाची नासाडी होत आहे.

राज्य सरकारच्या खरेदी केंद्रावर धानाला प्रतिक्विंटल १८०० रुपये हमीभाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी या केंद्रावर धान विकण्यास प्राधान्य देत आहेत. परंतु या केंद्रात धान ठेवण्यासाठी जागा नाही.

भंडारा येथील शेतकरी शंकर हलेमारे यांनी शेतात धान ठेवले आहे. पावसामुळे धानाचे नुकसान होईल ही भीती त्यांना सतावत आहे. ते धान खरेदीसाठी आपला क्रमांक येईल या आशेवर आहेत. गोंदिया जिल्ह्य़ातील अर्जुनी मोरगाव येथेही अशीच स्थिती आहे.

खरीप हंगामातील रोवणीला सुरुवात झाली आहे. मात्र अजून बऱ्याच शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील धान खरेदी झालेली नाही. तर काही शेतकऱ्यांनी पावसामुळे धानाचे नुकसान होईल म्हणून हमीभावापेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना धान विकत आहेत. शासकीय धान्य केंद्रावर खरेदीला विलंब होत असल्याचे पाहून व्यापाऱ्यांनी १३०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे धान खरेदी केली आहे. शासकीय धान खरेदी केंद्राच्या खरेदीच्या मर्यादेमुळे शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल ५०० रुपयांचे नुकसान होत आहे.

दुसरीकडे धान मोजणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना तीन-तीन महिने पैसे मिळत नाही. खरीप हंगाम असून शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. परंतु शासनाकडून त्यांच्या खात्यात पैसे टाकले जात  नाही. त्यामुळे आर्थिक अडचण होत आहे, असे भंडारा जिल्ह्य़ातील वाकेश्वर येथील शेतकरी सोमेश्वर मते म्हणाले.

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून धान खरेदी के ली जात आहे. धान खरेदीची गती वाढवण्याची विनंती गुरुवारी मंत्रालयात गेल्यानंतर त्या खात्यांच्या मंत्र्यांना करणार आहे.

– दादाजी भुसे, कृषीमंत्री.