*  उद्यानातील विमानांची दुरवस्था

*  वायुदलाची महापालिकेला सूचना

भारतीय वायुदलाने महापालिकेला दिलेल्या दोन युद्धविमानांची रंगरंगोटी आणि परिसर स्वच्छतेकडे महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. अंबाझरी आणि गांधीबाग उद्यानातील युद्धविमानांची झालेली दुरवस्था बघून ‘विमान भेट दिले, त्याला रंग तर लावा’ असे सांगण्याची वेळ वायुदल प्रशासनावर आली आहे. युवकांना वायुदलाकडे आकर्षित करुन घेण्यासाठी ही विमाने देण्यात आली होती.

अंबाझरी उद्यानात डिसेंबर २००१ मध्ये विमान बसवण्यात आले. तत्कालीन एअर चीफ मार्शल ए.वाय. टिपणीस यांनी संत्रानगरीला ‘हंटर’ युद्धविमान अर्पण केले होते. उद्यानाच्या दर्शनी भागात हे युद्धविमान ठेवण्यात आले. उद्यानाला भेट देणाऱ्या मुलांसाठी ते आकर्षणाचे केंद्र  ठरले होते. त्याची देखभाल दुरुस्ती व रंगरंगोटी करण्याचे काम महापालिकेचे होते, परंतु त्याकडे सपशेल दुर्लक्ष  झाले असून विमानाच्या चबुतऱ्यावरील फरशा निघाल्या आहेत. विमानाचा रंगही उडाला असून हे विमान एका बाजूला झुकले आहे.

गांधीबाग उद्यानातील युद्ध विमानाची अवस्थाही कमी अधिक प्रमाणात अशीच आहे. २० ऑक्टोबर १९८७ मध्ये तत्कालीन महापौर पांडुरंग हिवरकर यांच्या कार्यकाळात ते उद्यानात लावण्यात आले. सध्या तेथील काही भागात व्यापारी संकुल उभारण्याचे प्रस्तावित असल्याने या उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडे फारसे लक्ष दिले जात  नाही. अनुरक्षण कमान प्रशासनाने या दोन्ही उद्यानाची पाहणी केली असता त्यांना विमानाची दुरवस्था दिसून आली.

रामन केंद्र, व्हीएनआयटीतील विमान सुस्थितीत

शहरात रामन विज्ञान केंद्र आणि व्हीएनआयटीमध्ये वायुदलाने दिलेले विमान सूस्थितीत आहे. रामन विज्ञान विज्ञान केंद्राच्या आवारात एचपीटी३२ (एचएएल पिस्टन ट्रेनर ३२) या प्रशिक्षण विमान २०१७ बसवण्यात आले आहे. या विमानाला ‘दीपक’ असे नाव आहे. व्हीएनआयटीमध्ये मिग-२३ हे आहे.

दोन्ही उद्यानातील विमानाची देशभाल-दुरुस्तीसाठी कोटेशन मागवण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात काम सुरू केले जाईल. चबुतऱ्याचे ग्रॅनाईट बदलण्यात येणार आहेत. तसेच विमानाची रंगरंगोटी केली जाईल आणि विमानाची सविस्तर माहिती असणारे फलक येथे बसण्यात येणार आहे.

– अमोल चोरपगार, उद्यान अधीक्षक, महापालिका.