मुंबईपाठोपाठ छत्तीसगडच्या विद्यापीठाने मदत मागितली

उत्तरपत्रिका तपासणीसाठी मुंबई विद्यापीठापाठोपाठ राज्याच्या बाहेरच्या विद्यापीठांनीही नागपूर विद्यापीठाकडे धाव घेत ऑनस्क्रिन मूल्यांकन करून देण्याचे साकडे घातले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मूल्यांकनासाठी राबवलेल्या यशस्वी परीक्षा पद्धतीची ख्याती केवळ राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही पसरू लागली आहे. मुंबई विद्यापीठाचे मूल्यांकन नागपुरातील धनवटे नॅशनल महाविद्यालयात अद्यापही सुरूच आहे. त्यापाठोपाठ छत्तीसगडच्या पंडित रविशंकर शुक्ला विद्यापीठानेही नागपूर विद्यापीठाकडे पुनर्मूल्यांकनासाठी धाव घेतली आहे. यासंदर्भातील एक पत्र प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना प्राप्त झाले आहे.

आश्चर्य म्हणजे नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त पंडित रविशंकर शुक्ला विद्यापीठाची नॅशनल इन्स्टिटय़ूशनल रँकिंग फ्रेमवर्कमधील (एनआयआरएफ) अखिल भारतीय स्तरावरील क्रमांक महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठाच्या वर आहे. मात्र, पुनर्मूल्यांकनाची समस्या त्यांनाही भेडसावत आहे. त्यांना नागपूर विद्यापीठाकडून इंग्रजी उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन हवे आहे.

मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यापूर्वी नागपूर विद्यापीठाला महाराष्ट्रातील पाच विद्यापीठांनी भेट दिली आहे. त्यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ आणि इतर दोन विद्यापीठांनी नागपूरच्या परीक्षा पद्धतीचा अभ्यास केला आणि येथील काही पद्धती त्यांच्या मातृविद्यापीठात राबवता येतील काय? याचाही कानोसा घेतला. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल लावण्याची संपूर्ण पद्धतच कोलमडल्यानंतर त्याही विद्यापीठाला हातभार लावला आणि आता पंडित रविशंकर शुक्ला विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठाकडे धाव घेतली आहे. मात्र, पूर्ण शहानिशा करूनच त्यांच्या विनंतीचा स्वीकार किंवा नकार प्र-कुलगुरू कळवणार आहेत.

रायपूर येथील पंडित रविशंकर शुक्ला विद्यापीठाकडून नागपूर विद्यापीठाला पुनर्मूल्यांकनासंबंधीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यांनी ऑनलाईन स्क्रिन मूल्यांकन करून देण्याची विनंती केली आहे. मात्र, आधी त्यांची परीक्षा पद्धत पाहिल्यानंतरच निर्णय घेता येईल. तसेच त्यांची उत्तरपत्रिका पाठवण्याची पद्धतही पहावी लागेल.

डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ